- अमृता कदमतुम्ही पर्यटनाला का जाता? असं कोणी विचारलं तर उत्तर सोपं आहे. फिरायला जायचं ते मजा करण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, रोजच्या कामातून येणारा ताण हलका करण्यासाठी.
मग तुम्ही फिरण्यासाठी अशी ठिकाणं निवडा जी पूर्णपणे स्ट्रेस फ्री आहेत. ‘झिपजेट’ या ट्रॅव्हल पोर्टलनं एक सर्वेक्षण करून जगातील तणावमुक्त आणि तणावग्रस्त शहरांची यादी जाहीर केली आहे. तणाव कमी करणारे, तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणारे घटक लक्षात घेऊन ही यादी जाहीर करण्यात आलीये.हिरवळ, स्वच्छ हवा, कमीत कमी ध्वनी प्रदूषण, भविष्याची खात्री देता येईल असा बँक बॅलन्स आणि कामाचं समाधान हे सगळं असल्यावर तुम्ही आयुष्यात शांत आणि समाधानी राहणारच. हे सगळं आहे जर्मनीतल्या स्टुटगार्डमध्ये. किंबहुना जर्मनी हा देशच समाधानी आणि तणावमुक्त आहे. कारण तणावमुक्त देशांच्या पहिल्या दहा क्र मांकात चार शहरं जर्मनीतली आहे.
स्टुटगार्डच्या खालोखाल दुसरा क्र मांक आहे जर्मनीतल्या लक्झेंबर्गचा. लोकसंख्येची घनता, सामाजिक सुरक्षितता, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सुविधा आणि हिरव्यागार बागा यांमुळे लक्झेंबर्गला या यादीत दुसरा क्र मांक मिळाला आहे. या यादीत जर्मनीतल्याच हॅनोव्हरचा तिसरा क्र मांक, म्युनिचचा पाचवा तर हॅम्बुर्गचा क्र मांक नववा आहे.
‘झिपजेट’नं वेगवेगळे निकष लावून 500 ठिकाणांचा अभ्यास करु न जगातील तणावमुक्त शहरांची यादी जाहीर केली. तणावाला कारणीभूत ठरणा-या बेरोजगारी, शारीरिक आरोग्य, सुरक्षितता, रोजचा प्रवास अशा गोष्टींचा ही यादी जाहीर करताना विचार केला आहे. इतकंच नाही तर कळत नकळत तुमच्या मूड्सवर प्रभाव टाकणा-या हवामानासारख्या गोष्टीलाही ही यादी बनवताना विचारात घेतलंय.तणावाला कारणीभूत ठरणा-या या गोष्टींचा विचार करता या इराकची राजधानी बगदादनं तणावग्रस्त देशांच्या यादीत पहिला क्र मांक मिळवला आहे.
आता भारतातलं कोणतं शहर तणावमुक्त शहरांच्या यादीत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे कोणतंही नाही. किंबहुना तणावयुक्त शहरांमध्ये भारताची राजधानी दिल्लीचा समावेश आहे. दिल्लीतलं ट्रॅफिक, हॉर्न वाजवण्याच्या सवयीमुळे होणारं ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेची हमी नाही अशा कारणांमुळे दिल्लीचा तणावयुक्त शहरांमध्ये समावेश झालेला आहे.
तुम्हाला तुमचा तणाव कमी करायचा असेल, तर इकडं-तिकडं न जाता ज्या देशामध्ये कमीत कमी तणाव आहे तिथंच जायला हवं. मग फारसा विचार न करता जर्मनीची ट्रीप प्लॅन करायला काहीच हरकत नाही !