केसी फेंटनची गोष्ट गेल्या आठवड्यात वाचलीच. २१ वर्षांच्या केसीच्या आइसलॅण्ड प्रवासाची. त्यातूनच त्याला आदरातिथ्य उद्योगात “शेअरिंग इकॉनॉमी”चा प्रवेश करणाऱ्या “काऊच सर्फिंग”ची संकल्पना सुचली.
काऊच सर्फिंग म्हणजे काय, तर परदेशातल्या आपल्याला अनोळखी असलेल्या गावात, आपल्या समानधर्मी पण आपल्याला अनोळखी व्यक्तीच्या घरी अगदी हॉलमध्येही राहण्याची मोफत सोय. आता ज्यांना कमी पैशात प्रवास करायचे त्यांच्याचसाठी हर कल्पना उत्तम. ज्यांना ऐशोआराम हवा, तारांकित हॉटेल्स हवी त्यांच्या कामाची नाही ही गोष्ट. पण गेल्या काही वर्षात जगभरच ‘लोकल कनेक्ट’ महत्त्वाचा मानून हॉटेल्स नाकारून कुणाच्या घरी राहणे, ब्रेड ॲण्ड ब्रेकफास्टसारखे म्हणजेच बीएनबीसारखे पर्याय निवडणे हे सुरु झाले.
बीएनबी अर्थातच मोफत नसते पण हॉटेल्सपेक्षा तुलनेने स्वस्त असते. काऊच सर्फिंगही देखील एक वेबसाइट आहे. ती वापरून तुम्ही कुणाला आपल्या घरी मोफत राहायला बोलावू शकता किंवा मोफत दुसऱ्याच्या घरी राहायला जाऊ शकता. पण मुळात प्रश्न असा आहे, की ओळख ना पाळख कोण अनोळखी परदेशी माणसाला आपल्या घरात राहायला जागा देईल? सुरक्षिततेची काय हमी?
मात्र, सोशल नेटवर्किंग आणि शेअर इकॉनॉमीच्या या काळात हे शक्य आहे. काऊच सर्फिंगची वेबसाइट आहे. तिथं आधी स्वत:ला रजिस्टर करावं लागतं. आपलं पूर्ण प्रोफाइल बनवावं लागतं. आपले फोटो, आवडीचे विषय, आपण का प्रवास करतोय, असं सगळं. एक असं प्रोफाइल जे वाचून इतरांना असं वाटलं पाहिजे की या व्यक्तीशी ओळख करून घेणं, समान आवडी यातून हा संवाद मैत्रीपर्यंत जाऊ शकतो. पैसे देवाणघेवाण नाही, पण समान आवडी, पॅशन, गप्पा हे यातलं सूत्र.
अर्थात यात सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आपण प्रोफाइल केलं आणि मेल लिहिल्या की मी अमुक तारखेला येणार आहे तर लगेच कुणी हो म्हणेल असे नाही. हळूहळू शोधत, आपल्याविषयी खरी माहिती सांगत ही साइट एक्सप्लोअर करत अनुभवातूनच शिकत जाणं हा यातला पर्याय आहे.