अत्याधुनिक सुविधा असलेल्या लग्झरी बस मधून दिल्ली ते लंडन प्रवासाची सुविधा अॅडव्हेन्चर ओव्हरलँड ही खासगी कंपनी सुरु करत असून सप्टेंबर २०२२ मध्ये पहिली सफर सुरु होईल असे सांगितले जात आहे. ७० दिवसांच्या या प्रवासात पर्यटक २० हजार किमी प्रवास करणार आहेत. हा प्रवास १८ देशातून होणार आहे. साधारण १५ लाख रुपये त्यासाठीचा खर्च करावा लागेल. मात्र त्यात तिकीट, व्हिसा, विविध देशात राहण्याची सुविधा मिळणार आहे. या २० सीटर बस मध्ये प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र केबिन, खाणे पिणे, झोपण्याची सुविधा मिळणार आहे.
तब्बल ४६ वर्षानंतर दिल्लीलंडन बस प्रवासाची संधी पुन्हा एकदा पर्यटकांना मिळणार आहे. यापूर्वी ब्रिटीश कंपनीने १९५७ मध्ये दिल्ली लंडन कोलकाता अशी सर्वप्रथम बससेवा सुरु केली होती. पण ही बस अपघातग्रस्त झाली. त्यानंतर एका ब्रिटीश प्रवाशाने डबलडेकर बस बनवून सिडने – भारत- लंडन बससेवा सुरु केली होती ती १९७६ पर्यंत सुरु होती. मात्र दरम्यान इराण मधील परिस्थिती बिघडली आणि भारत पाक तणाव सुरु झाला तेव्हा ही सेवा बंद केली गेली.
आता पुन्हा एकदा भारतीय अॅडव्हेन्चर ओव्हरलँड कंपनीने मार्ग बदलून दिल्ली लंडन बस सुरु केली आहे. पाकिस्तान अफगाणिस्थान ऐवजी ती म्यानमार, थायलंड, चीन, किर्गीस्तान मधून फ्रांस, तेथून इंग्लिश चॅनल क्रुझ मधून पार करून लंडन अशी जाणार आहे. कंपनीने २०१७ पासून २०१९ पर्यंत छोट्या लग्झरी गाड्यातून या प्रवासाच्या चाचण्या केल्या आहेत. पण करोना मुळे गेली दोन वर्षे यात फार प्रगती होऊ शकली नव्हती असे समजते.