-अमृता कदमप्रवासाच्या तयारीमध्ये जितक्या काळजीनं आपण आपल्या छोट्या-मोठ्या वस्तू निवडत असतो, तितक्याच काळजीनं आपण आपली प्रवासी बॅग निवडतोच असं नाही. चालतंय की असं म्हणत घरातल्याच सुटकेस, हँडबॅगमध्ये कपडे भरले जातात...कधीकधी अगदी कोंबलेही जातात! आपल्या जवळचं सामान नीट भरताना बॅगांची संख्याही वाढते. प्रवासात या ओझ्याचं अगदी लोढणं होतं. त्यामुळेच योग्य आकाराची, सर्व सामान नीट मावणारी, आपल्या प्रवासाला अनुरुप अशी बॅग निवडणं गरजेचं आहे. बॅग निवडताय मग याचा विचार केला का? 1.तुमचा प्रवास किती दिवसांचा असणार आहे, याचा विचार करु न बॅगेचा प्रकार निवडणं आवश्यक आहे. जर तुम्ही वीकेंड ट्रीपसाठी जात असाल, तर तुमच्यासाठी वजनानं हलकी अशी कॅरी आॅन किंवा छोटीशी डफेल बॅगही पुरेशी आहे. जर ट्रीप मोठी असेल तर मात्र बॅगेचा वेगळा पर्यायही ट्राय करु शकता. 2.तुम्ही कोणत्या वाहनानं प्रवास करणार आहात याचाही विचार बॅग निवडताना करणं गरजेचं आहे. तुम्ही विमानानं प्रवास करणार आहात की ट्रेननं की बसनं यानुसारही बॅगेचा प्रकार बदलू शकतो. तुमचा प्रवास जर ट्रेन आणि बस, विमान आणि बस किंवा ट्रेन असं दोन किंवा अधिक वाहनांचं कॉम्बिनेशन असेल तर मात्र सर्वांत मस्त पर्याय लाइटवेट कॅरी आॅन किंवा चाकं असलेली बॅकपॅक!3.तुम्ही जर ट्रेकिंग, दुर्गम ठिकाणी कँम्पिंगसाठी, अॅडव्हेंचर ट्रीपसाठी जाणार असाल तर हलक्या वजनाचे बॅगपॅक पुरेसे आहेत. पण छान रमत-गमत फिरण्यासाठी काढलेली ट्रीप असेल, मुक्काम हॉटेलमध्येच करणार असाल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हाताशी वाहन असेल तर मोठी ट्रॅव्हल बॅग घ्यायला काहीच हरकत नाही. आपल्या प्रवासाचं स्वरु प हे काही नेहमीच एकसारखं नसतं. त्यामुळेच वर नमूद केलेल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्रवासी बॅगांचं स्वत:चं असं छान कलेक्शन करु शकता.प्रवासी बॅगेचे पर्याय
* लाइटवेट कॅरी आॅनवीकेंड ट्रीप्स, एखाद्या रात्रीचा मुक्काम किंवा छोटीशा बिझिनेस ट्रीपसाठी अतिशय उपयुक्त. रिट्रॅक्टेबल हँडल, टिकाऊ चाकं, तुमचं सामान नीट ठेवण्यासाठी कप्पे यांमुळे बऱ्याच लोकांची पसंती कॅरी आॅनना असते. शिवाय विमान प्रवासामध्ये एअरलाइन्सनं घालून दिलेली सामानाच्या वजनाची मर्यादा पाळण्यासाठीहा कॅरी आॅन सोयीचे पडते. * डफेल बॅग आणि रोलिंग बॅग्सएक मोठी सुटकेस तिच्या हँडलला धरून वागवत नेण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. तुम्हाला जर तुमचं सामान शिस्तीत, ऐसपैसपणे भरायचं असेल तर डफेल बॅग तुमच्यासाठी उत्तम. रोलिंग बॅगचाही आॅप्शन त्यासाठी चांगला आहे. शिवाय तुम्हाला बॅगेला दोनच चाकं हवी आहेत की चार चाकं हे तुमच्या सोयीनं तुम्ही ठरवू शकता. चार चाकांचा फायदा हा की बॅग कुठेही खेचत नेणं सोपं होतं. फक्त बॅग घेताना ती चांगल्या प्रतीची बघून घ्यावी. नाहीतर त्याची चाकं लवकर झिजतात तरी किंवा तुमचा कंट्रोल न राहता बॅग वेडीवाकडी ओढली जाते.