दुबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारा बुर्ज खलिफा. सोनेरी वाळूचं वाळवंट आणि समुद्राच्या मध्यभागी तयार करण्यात आलेलं पामच्या झाडांच्या आकाराचे बेट. जगाच्या नकाशावर आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी दुबईने अनेक अविश्वसनीय गोष्टी शक्य केल्या आहेत. हे जरी खरं असलं तरिही आता दुबई पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे. आता वाळवंटाच्या मध्यभागी दुबईने असं काहीतरी साकारलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरात त्याची चर्चा होत आहे.
तुम्ही कधी वाळवंटातील मृगजळाबाबत ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल आम्हाला नक्की काय सांगायचंय. पण हे लांबून जरी मृगजळाप्रमाणे दिसलं तरिही हे मृगजळ नसून खरे तलाव आहेत. अलीकडेच दुबईने या दोन हार्ट शेप तलाव तयार केले असून काही दिवसांपूर्वीच दुबईच्या सध्याच्या राजकुमाराने याचे उद्घाटन केले आहे. तलावाच्या वैशिष्ट्याबद्दल सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे दोन्ही तलाव इतके मोठे आहेत की, Google Earth वरूनही हे सहजपणे पाहता येत आहेत.
'लव्ह लेक' असं या तलावाला नाव देण्यात आलं असून हे अल ब्रुद येथील कृत्रिम लेगोनच्या जवळ आहे. जगभरातील प्रसिद्ध बुर्ज खलीफा 50 किमी. अंतरावर आहे. या लेकचे फोटो दुबईच्या राजकुमारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
अल-कुद्राच्या तळापासून 700 मीटर अंतरावर हे तलाव आहे. तलावाच्या निर्मात्यांनी तलावाजवळ वृक्षारोपण करून 'LOVE' असे शब्द लिहिले आहेत. तसेच हा लेक वाळवंटाच्या मध्यभागी असला तरिही अधिकाऱ्यांनी जागोजागी रस्ता दाखविणाऱ्या सुचनांचे फलक लावले आहेत. जेणेकरून हा लेक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यंटकांना रस्ता शोधताना कोणताही त्रास होणार नाही.