- अमृता कदममहाराष्ट्राला ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे, त्याचप्रमाणे कोलकात्यात दुर्गापूजेची. खरं तर देशभरात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात घट बसतात, उत्तर भारतात कडकडीत उपवास आणि कुमारिकांचं पूजन असतं, गुजरातमध्ये दांडिया-गरबा खेळला जातो तर दक्षिण भारतातही शक्तीचा हा उत्सव साजरा केला जातो. पण तरीही देशविदेशातल्या पर्यटकांना आकर्षण असतं ते बंगालमधल्या दुर्गापूजेचं. नवरात्रींमध्ये कोलकात्यामध्ये एका वेगळ्याच चैतन्याचा आविष्कार पहायला मिळतो. त्याचा भाग होणं हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव असतो.
मुळात इथल्या दुर्गापूजेची सुरूवात प्रतिपदेपासून होत नाही. तर ती पंचमीला होते. म्हणजे पाचव्या दिवशी दुर्गेचं आगमन होतं. आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो महाअष्टमीचा. तुम्ही जर दुर्गापूजेसाठी कोलकात्याला जाण्याचं नियोजन करत असाल तर हा दिवस अजिबात चुकवू नका. या दिवशी देवीला फुलांची आरास केली जाते. देवीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे भोग (आपल्या भाषेत नैवेद्य) बनवले जातात..
अष्टमीलाच इथल्या मंडपांमध्ये, मंदिरांमध्ये देवीसमोर कुमारिका पूजन केलं जातं. पाच ते आठ वर्षांच्या मुलींची साग्रसंगीत पूजा होते आणि त्यांना जेवू घातलं जातं. बंगालमधल्या कुमारिका पूजनाची सुरूवात रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा माँ यांनी दक्षिणेश्वर काली मंदिरातून केली. त्यांनंतर सगळीकडेच हे कुमारिका पूजन केलं जाऊ लागलं. बेलूर मठाकडून तर संपूर्ण कोलकाताभर कुमारिका पूजन होतं.
आपल्याकडे ज्याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते, त्याचप्रमाणे कोलकात्यात दुर्गापूजेच्या वेळी मंडपांमधून संध्या आरती केली जाते. या संध्या आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे ‘ढाक’च्या तालावर केला जाणारा ‘धुनुची नाच’. हातात धूपाची भांडी घेऊन ती स्वत:भोवती फिरवून हा नाच केला जातो. यांमुळे दुष्ट शक्ती दूर जातात आणि माता प्रसन्न होते, अशी भाविकांची धारणा आहे. स्त्री-पुरु ष मोठ्या उत्साहानं या नाचात सहभागी होतात. अर्थात, दांडिया किंवा गरबाप्रमाणे हा नाच म्हणजे ‘इव्हेंट’ नाहीये. तो आरतीच्या वेळी तितक्याच पावित्र्यानं केला जातो.
रसगुल्ला किंवा बंगाली भाषेतच बोलायचं म्हटलं तर ‘रोशोगुल्ला’ ही बंगाली खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेला आहे. पण दुर्गापूजेच्या वेळेस तुम्हाला इथे वेगवेगळे पारंपरिक खादयपदार्थांची चव चाखायला मिळते. अगदी पूजेच्या मांडवापासूनच याची सुरूवात होते. या मंडपांमध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल्सही असतात. रेस्टॉरण्ट, हातगाड्यांवर खायला गर्दी लोटते.
या दिवसांत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्र मही सादर केले जातात. विशेषत: तरूणाईचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर या कार्यक्र मांना मिळतो.दुर्गाविसर्जनाच्या दिवशी इथला चुकवू नये असा कार्यक्र म म्हणजे ‘सिंदूर खेला’. कोलकात्याचे रस्ते गर्दीनं फुललेले असतात. लाल काठाची पांढरी साडी नेसलेल्या बायका एकमेकींना कुंकू लावतात. आता तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडच्या हळदी-कुंकवाप्रमाणेच हा प्रकार असेल. तर तसं नाहीये. इथे होळीत जसा रंग खेळला जातो, तसं कुंकवानं एकमेकींना रंगवलं जातं. या सिंदुर खेल्याची झलक टिपण्यासाठी फोटोग्राफर उत्सुक असतात.
या पाच दिवसांच्या जल्लोषानंतर जेव्हा माँ दुर्गेला निरोप देण्याची वेळ येते, त्या भावूक क्षणालाही तिथे असायलाच हवं. हुगळी नदीच्या पात्रात दुर्गा विसर्जन होतं आणि नवरात्रीची सांगता होते.बंगालमध्ये पाचव्या दिवसापासून दुर्गापूजेची सुरु वात होत असल्याने तुम्ही आता, अगदी ऐनवेळीही कोलकात्यासाठी तिकीट बुक करु शकता. पाच दिवसांची ही कोलकात्यातली दुर्गापूजा तुम्हाला आयुष्यभराचा अविस्मरणीय अनुभव नक्कीच देईल.