दसरा देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. असे मानले जाते की, लंकेत ९ दिवसांच्या युद्धात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापति रावणाचा वध केला होता. याचाच आनंद दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो. देशभरात दसरा एक दिवस साजरा केला जातो. पण देशात एक असही शहर आहे जिथे दसरा ७५ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्याचा दिवस इथे भगवान राम आणि रामायणाला समर्पित नाही तर देवी दंतेश्वरीसाठी साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या अनोख्या दसऱ्याबाबत....
बस्तर नावाने दसरा प्रसिद्ध
छत्तीसगढच्या बस्तर परिसरातील दसरा चांगलाच प्रसिद्ध आहे. ७५ दिवस चालणारा हा दसरा बस्तर दसरा म्हणून ओळखला जातो. मान्यता आहे की, भगवान रामाने त्यांच्या वनवासातील बराच काळ दंडकारण्यमध्ये घालवला होता. हा भाग बस्तरचा प्राचीन भाग आहे.
देवी दंतेश्वरीची पूजा
रामाने रावणाचा वध केला म्हणून या शहरात दसरा साजरा होत नाही तर इथे देवी दंतेश्वरीची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी इथे विशेष पूजेचं आयोजन केलं जातं. तसेच भव्य रथ यात्राही काढली जाते. देवी दंतेश्वरीला समर्पित या दसऱ्याची तयारी आणि उत्सव ७५ दिवसांआधी सुरु होते.
जनतेच्या समस्या ऐकल्या जातात
७५ दिवस चालणारा हा उत्सव दसऱ्यानंतरही सुरु असतो आणि मुरिया दरबार प्रथा संपल्यावर या उत्सवाची सांगता होते. या रिवाजात बस्तरचे महाराज आपला दरबार लावतात आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. तसेच त्यावर तोडगाही काढतात.
रथ तयार करण्याची ६०० वर्ष जुनी प्रथा
रथ तयार करण्याचं काम केवळ संवरा जमातीचे लोक करतात. पण आधुनिक भारतात ही जमात जवळपास विलुप्त झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या जमातीच्या लोकांना आपली जात बदलून रथ तयार करावा लागतो. तेव्हाच ते रथ तयार करु शकतात.