दापचेरी तपासणी नाक्यावर इलेक्ट्रॉनिक पावती मिळणार
By admin | Published: August 31, 2015 9:30 PM
दापचेरी तपासणी नाक्यावर इलेक्ट्रॉनिक पावती मिळणार
दापचेरी तपासणी नाक्यावर इलेक्ट्रॉनिक पावती मिळणारपरिवहन विभागाच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी मुंबई - परिवहन विभागाच्या अखत्यारित येणार्या सीमा तपासणी नाके भ्रष्टाचाराचे आगारच मानले जातात. हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाण्यातील दापचेरी येथील सीमा तपासणी नाक्याचे आधुनिकीकरण करण्यात आले असून मालवाहतूकदारांना इलेक्ट्रॉनिक पावती दिली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रकच परिवहन विभागाकडून काढण्यात आले आहे. राज्यात २२ सीमा तपासणी नाके असून मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र या सीमा तपासणी नाक्यांना गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराने वेढले. ओव्हरलोड वाहनांना काही सीमा तपासणी नाक्यांवर अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने कारवाई न करताच सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. यात तर तत्कालिन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी काही महिन्यांपूर्वी दापचेरी येथे टाकलेल्या छाप्यात तपासणी नाक्यांवरील भ्रष्टाचारही उघडकीस आला होता. यानंतर झगडे यांनी निर्बंध आणण्यासाठी अहवालही तयार केला होता. त्याचप्रमाणे त्यापूर्वीचे परिवहन आयुक्त व्ही.एन.मोरे यांनी तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले होते. एकूणच सीमा तपासणी नाक्यांचा आधुनिकीकरणासाठी सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आणि त्या दृष्टिने ठाण्यातील दापचेरी येथे आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात मालवाहू गाड्यांची इलेक्टॉनिक वजन काट्यांमार्फत वजन होऊन कंम्प्युटराईज पावती मिळेल. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण येईल, अशी आशा परिवहन विभागाकडून व्यक्त केली जात आहे. तर गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकाही ठेवण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.