तुम्हाला रोमांचक प्रवास आवडतो, डोंगरदऱ्यांसोबत तुम्हाला काही मोकळा वेळ घालवायचा आहे? जर तुम्हाला रोमांचक प्रवास करण्याची आवड असेल आणि तसा प्रवास करण्याचा तुमचा काही विचार सुरु असेल तर एक बेस्ट पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. देहरादून ते नेपाळ बससेवा सुरु झाली असून या प्रवासात तुम्हाला कधीही न मिळाल्याचा आनंद मिळण्याची पूर्ण संधी आहे.
देहरादून ते नेपाळ बसने रोमांचक प्रवास करुन या प्रवासाच्या अनेक खास आठवणी तुम्ही आयुष्यभरासाठी मनाच्या कोपऱ्यात ठेवू शकता. कारण हा प्रवास इतर प्रवासांपेक्षा फार वेगळा अनुभव देणारा असेल. चला जाणून घेऊ तुम्ही या प्रवासाचा आनंद कशाप्रकारे घेऊ शकता.
देहरादून रोडवेजच्या बसने तुम्ही नेपाळच्या महेंद्रगड येथे पोहोचू शकता. उंचच डोंगरदऱ्या, खळखळत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत तुम्ही ८ ते ९ तासात तिथे पोहोचाल. हा प्रवास करताना बस वेगवेगळ्या ठिकाणी थांबणारही आहे. त्यामुळे तुम्ही देहरादून ते नेपाळ दरम्यानच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. जेणेकरुन हा प्रवास नेहमीसाठी तुमच्या स्मरणात राहील.
निर्सगाच्या जवळ जाण्याची संधी
तसे तर फ्लाइटने थेट देहरादूनहून नेपाळची राजधानी काठमांडूला जाण्यासाठी केवळ ३ ते ४ तासांचा वेळ लागतो. पण या प्रवासात तुम्ही नैसर्गिक सौंदर्य वरुन बघत असता. पण हेच नैसर्गिक सौंदर्य जवळून बघण्यासाठी वेगळीच मजा असते. तसेच याने मनालाही वेगळाच अनुभव मिळतो. अशात तुमची ही इच्छा बस प्रवासाने पूर्ण केली जाऊ शकते. तुम्ही देहरादूनचे सुंदर डोंगर बघू शकाल. रस्त्यात डोंगरातून खाली येणाऱ्या झऱ्यांचा आवाज ऐकू शकाल. त्यासोबतच तिबेट आणि भारताशी मिळत्या जुळत्या नेपाळच्या संस्कृतीला जवळून बघू शकाल.