ज्या ठिकाणी सर्वात जास्त बर्फवृष्टी होते तेथील लोक बर्फात इग्लू बांधून राहतात. पण तुम्ही असा विचार करत असाल की, इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी आर्कटिक किंवा अंटार्टिकमध्ये जावं लागेल तसं अजिबात नाहीये. याचा अनुभव तुम्ही भारतातही घेऊ शकता. भारतातली मनाली या जगभरात लोकप्रिय हिलस्टेशनला तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कारण इथे इग्लू टुरिज्मच सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हीही इथे हा अनुभव घेऊ शकता.
कुल्लू-मनालीमध्ये हिवाळ्यात पर्यटनाला वाढवण्यासाठी दोन तरूणांनी इग्लू टूरिज्मची सुरूवात केली आहे. हे कुल्लू जिल्ह्यातील हमता गावाजवळ तयार करण्यात आलं आहे. इथे इग्लूमध्ये राहण्यासाठी आणि हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. या तरूणांनी ट्रायल म्हणून इग्नू तयार केलं होतं. पण नंतर याला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी हा प्लॅन चांगल्याप्रकारे ऑर्गनाइज केलाय.
आता या तरूणांनी ३ इग्लूंची निर्मिती केली आहे ज्यात राहण्याचा अनुभव तुम्ही कमी खर्चातही घेऊ शकता. जर तुम्हाला एक रात्र इग्लूमध्ये राहायचं असेल तर ५ हजार ५०० रूपये प्रति व्यक्ती खर्च करावे लागतील. या पैशांमध्ये तुम्हाला लोकल फूडही मिळणार आहे. तसेच काही अॅक्टिविटीजचाही समावेश असेल.
एका इग्लूचं निर्माण करण्यासाठी साधारण ४० हजार रूपये खर्च येतो आणि एक इग्लू तयार करण्यासाठी ६ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच इग्लूची देखरेखही फार करावी लागते. सध्या चांगलीच थंडी पडत आहे. अशात तुम्ही हा आनंद घेऊ शकता. पण तुम्हाला यासाठी लगेच प्लॅन करावा लागेल नाही तर हिवाळा संपेल.