डोंबिवली: शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भाऊ चौधरी हे जेव्हा कल्याण-डोंबिवली परिवहन सभेचे सभापती होते तेव्हा सुमारे २१८ बसेस होत्या, त्यापैकी सुमारे १७० हून अधिक बसेस रस्त्यावर धावायच्या. माझ्या कार्यकाळात ११८ पैकी सुमारे ७० बसेस त्या देखिल मिडी रस्त्यावर धावतात. त्यापासून मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला.परिवहनचे खाजगीकरण करण्याची गरज नाही, पण राहुल दामले हे स्थायीचे सभापती आहेत, त्यांनी नुकताच पदभार स्विकारला असून त्यांना पहिल्या बैठकीत जे भावले ते त्यांनी मत व्यक्त केले. त्यांचे म्हणणे काही योग्य आहे, इथल्याकाही चालक-वाहकांच्या मनमानीला त्यामुळे चाप बसेल आणि प्रवाशांना विनाखंड सेवा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी सभापती चौधरी यांच्या काळात परिवहनचे उत्पन्न साडेसहा-सात लाखांवर गेल्याचा दावा ते करत असतीलही पण तेव्हा बस धावण्याची संख्या जास्त होती, हे पण लक्षात घ्यायला हवे. तसेच शामा अँड शामा कंपनीला तेव्हा आम्ही देखभालीसाठी महिनाकाठी लाखो रुपयांची बील अदा करायचो. आता तेवढी बील निघत नाहीत. ती देखिल बचत नाही का? आम्ही त्या विषयावर बोलत नाही, पण ती रक्कम देखिल उल्लेखनिय असून ती माझ्याच कार्यकाळात बचत झाली, असा दावा पावशे यांनी केला.स्वच्छतेसंदर्भात काही विशेष टेंडर निघतील, त्यानंतर तातडीने बदल दिसतील. पण प्रवाशांनी काही काळ सहकार्य करावे, जेवढे सातत्य सेवेत आम्ही ठेवले तेवढे कोणाच्याही काळात होते का याचे देखिल प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे. बस फेल्यूअरचे प्रमाण प्रचंड कमी झाले असून विनाखंड बससेवा देण्यासाठी मी प्रचंड काम केले असून सातत्याने वाहक-चालकांच्या संपर्कात असतो असेही पावशे म्हणाले. परिवहनची सुविधा प्रवाशांना हवी असून या वर्षभरात माझ्या कालावधीत टिटवाळा- कल्याण या रेल्वेच्या अडचणीच्या काळात आम्ही विशेष सेवा दिली. रेल्वेच्या ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या महामेगाब्लॉकमध्येही केडीएमटीने विशेष सुविधा विविध रुटवर दिली. पावसाळयात देखिल अडीअडचणीच्या काळात स्थानकापासून सुविधा दिली. याचीही नागरिक निश्चितच नोंद घेतील असाही टोला पावशे यांनी चौधरी यांना लगावला. आता लवकरच आणखी बसेस रस्त्यावर येतील आणि त्यामुळे प्रवाशांची सोय होईल, तसेच उत्पन्नावरही सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली परिवहनची आर्थिक स्थिती चांगलीच- संजय पावशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:13 PM
कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला.
ठळक मुद्दे७५ बसेसमधून मिळणारे ५.५ लाखांचे उत्पन्न चांगलेच भाऊ चौधरींच्या काळात शेकडो बसेस धावायच्या