- मयूर पठाडेरोजचं तेच रुटिन, तेच घर, तेच आॅफिस, रोजच्या त्याच कटकटी आणि जगण्याची रोजची तीच ती लढाई. अशावेळी बाहेर कुठे तरी भटकून यावं, निसर्गाच्या सान्निध्यात जावं आणि फ्रेश होऊन पुन्हा नव्या जोमानं आपल्या कामाला लागावं, निसर्गातला तो आनंद आपल्या जगण्यातही भरावा असं आपल्याला सारखं वाटत असतं. त्यासाठीच कुठे तरी हटके ठिकाणी जावं असं आपल्याला वाटत असतं.पण नेमकं कुठे जाल? इंटरनेटवर नुसतं सर्च केलं तरी अशी हटके हजारो ठिकाणं आपल्याला सापडतील, पण ते ठिकाण नुसतं हटके असून उपयोग नाही, आपल्या आवाक्यातलंही ते असलं पाहिजे.त्यासाठी काय कराल?
अशा हटके ठिकाणी जाण्यापूर्वी नेमकं काय कराल?१- नेहमीपेक्षा वेगळी अशी ठिकाणं खूप मिळतील, पण त्यातल्या रिस्कचाही विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी जास्त रिस्क आहे, ज्या ठिकाणांविषयी आपल्याला काहीच माहीत नाही अशी ठिकाणं शक्यतो टाळलेलीच बरी.२- आपल्या आवाक्यातलं आणि चांगलं असं ठिकाण निवडल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे त्या ठिकाणचे लोकल कॉँटॅक्ट्स मिळवणं. हा स्थानिक संपर्क नुसत्या अडचणीच्या वेळीच नव्हे, त्याठिकाणचे संदर्भ मिळवण्यासाठीही खूप उपयोगी पडतात.३- ज्या ठिकाणी आपण जात आहोत, त्याठिकाणी राहाण्याची सोय काय आहे, याची तपासणी आधीच केलेली केव्हाही बरी. आपण ज्या ठिकाणी जातोय ते ठिकाण खरोखरच हटके असेल, तर त्याठिकाणी हॉटेल्स वगैरेची पुरेशी सोय नसू शकते. असली तर हॉटेल्स बुक असण्याची शक्यताही खूप मोठी असते. घरगुती राहाण्याची सोय असली तरी आपल्यासाठी ती सोयीची आहे की नाही याचीही खात्री करायला हवी. विशेषत: ज्यावेळी आपल्या सोबत आपले कुटुंबीय, महिलाही सोबत आहेत त्यावेळी तर या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी.४- दुर्दैवानं काही इमर्जन्सी उद्भवलीच, तर त्यासाठीची तयारीही आधीच करायला हवी. महत्त्वाचे फोन नंबर्स, जवळचा कॉन्टॅक्ट नंबर, जरुरीच्या वेळी लागणारी औषधं, एक्स्ट्रॉ कपडे.. एवढंच नाही, आपला बॅकअप प्लॅनही तयार हवा.५- सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतीलच असं नाही, त्यासाठी अगदी ट्रॅव्हल एजंटचीही मदत घ्यायला काहीच हरकत नाही.