डोंबिवली : कल्याण, बदलापूर, वांगणी परिसरांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला जास्तीतजास्त मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात केली. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारनेही मदत दिल्यास हजारो पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.
२६ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराचा मुद्दा पाटील यांनी बुधवारी लोकसभेत मांडला. या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घराच्या पत्र्यांपर्यंत पाणी पोहोचले होते. अनेक इमारतींनाही झळ पोहोचली. राज्य सरकारच्या तरतुदीनुसार पूरग्रस्तांना केवळ पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ च्या राज्य सरकारच्या अध्यादेशात सुधारणा करण्याचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याची पाच हजार रुपयांची मदत आणखी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक साह्य दिल्यास पूरग्रस्तांना आणखी मदत देता येईल, असेही खा. कपिल पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेमार्गावरील वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवले होते. नौदल, एनडीआरएफ, अग्निशमन दल, रेल्वे, महसूल विभागाबरोबरच चामटोली ग्रामस्थांनीही पाण्यातून गाडीपर्यंत पोहोचत प्रवाशांना मदत केली.