- अमृता कदमएकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्च आणि मंदिरं, सी-फूडचे नानाविध प्रकार, पब आणि क्लब...मौजमजा करायची असो की थोडासा निवांतपणा हवा असो गोवा बेस्ट आॅप्शन आहे. हे आम्ही नाही सांगत तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुगल इंडिया रिपोर्टनुसार गोवा हे भारतातलं पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे.
गोव्याखालोखाल पर्यटकांची पसंती मिळवली आहे अंदमान आणि निकोबार बेटांनी. निसर्गानं मुक्त हस्ते सौंदर्य उधळलेल्या या बेटांच्या लोकप्रियतेत वर्षभरात 39.8 टक्के एवढी वाढ झाली आहे. मनाली, सिमला आणि उटी या हिलस्टेशन्सनीही पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये स्वत:चं स्थान टिकवून ठेवलं आहे. फेब्रुवारी ते एप्रिल 2017 दरम्यान भारतीयांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. परदेशी पर्यटनस्थळांचा विचार केला तर भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे अमेरिकेला. त्याखालोखाल क्रमांक आहे संयुक्त अरब अमिरातीचा. त्यातही दुबईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. परदेशात फिरायला जाणारे पर्यटक थायलंडलाही आपली पसंती देतात. थायलंडच नाही तर नेपाळ, इंडोनेशिया आणि भूतानसारख्या छोट्या शेजारी देशांच्याबद्दलही भारतीय प्रवाशांच्या मनात कुतूहल आहे. त्यामुळेच या देशांमधल्या पर्यटनस्थळांबद्दल, इथल्या प्रवासाबद्दल विचारल्या जाणारी माहितीमध्ये अनुक्र मे 64.8 टक्के, 42.1 टक्के आणि 40.8 टक्के इतकी वाढ झाली आहे.
भारतीय पर्यटक केवळ वेगवेगळे देश आणि तिथली पर्यटनस्थळं याबद्दलच माहिती घेत नाहीत तर विमानप्रवास आणि परदेशातील राहण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या सोयीबद्दलही जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या रिपोर्टवरु न स्पष्ट होतं. वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाइटमुळे प्रवासाचं नियोजन आणि महत्त्वाचं म्हणजे राहण्याच्या सोयी खिशाला परवडणाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा एखादी मोठी ट्रीप प्लॅन करणं हे केवळ मेट्रो सिटीमध्ये नाही तर अगदी लहान शहरांमध्येही वाढताना दिसत असल्याचं हा अहवाल आवर्जून नमूद करतो. गुगल सर्चच्या रिपोर्टमधील आकड्यांच्याच भाषेत सांगायचं तर पर्यटनस्थळांबद्दल माहिती घेणाऱ्या लोकांपैकी 40.8 टक्के लोक हे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु , हैदराबाद, अहमदाबाद या मेट्रो सिटीच्या बाहेरचेच होते. हातात आलेल्या स्मार्टफोन्समुळे कितीही लांबच्या प्रवासाचं नियोजन कसं सहजसोपं झालंय हेही या अहवालातून कळतं. मोबाईलवरून पर्यटनस्थळांबद्दलची, प्रवासाबद्दलची माहिती घेणाऱ्यांच्या संख्येत थोडी थोडकी नाही तर 96 टक्क्यांनी वाढ झालीये,.
फिरण्याच्या बाबतीत आपण नेहमीच परदेशी प्रवाशांकडे खूप कौतुकानं पाहतो. पण आता प्रवासाबद्दलचा भारतीयांचा उत्साह आणि उत्सुकताही वाढत असल्याचं या अहवालाच्या निमित्तानं स्पष्ट झालंय!