- अमृता कदम
हौसेला मोल नसतं असं म्हणतात. फिरायची हौस पूर्ण करण्यासाठी आपला खिसा गरम असायला हवा असा एक सर्वसाधारण समज आहे. पण फिरण्याची तुमची हौस आणि इच्छा तीव्र असेल तर ही गोष्ट तुमच्या मार्गात अडथळा नाही बनणार. फिरायला गेल्यावर सगळ्यांत जास्त खर्च होतो तो महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याचा. पण याच खर्चाला कात्री लागली तर ट्रीपचं बजेटही कमी होतं. म्हणूनच अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घ्या जिथे तुम्ही तीन दिवसांची ट्रीप अगदी माफक बजेटमध्येही करु शकाल.
1. ओरछा, मध्यप्रदेश
झाशीपासून 16 किमी अंतरावर मध्यप्रदेशचा ओरछा हा परिसर पूर्णपणे पर्वतांनी व्यापलेला आहे. अत्यंत प्राचीन अशी मंदिरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. शिवाय या जागेचं सौंदर्य सर्वात जास्त खुलतं ते पावसाळ्यात. इथली पावसाळी सकाळ अनुभवणं हा अगदी विलक्षण अनुभव आहे. ओरछामध्ये 2 रात्री, 3 दिवसांचा मुक्काम अगदी चांगल्या हॉटेलमध्ये करायचं ठरवलंत तरी खर्च अवघा पाच हजाराच्या घरातच येतो.
2. डलहौसी ( हिमाचल प्रदेश)
देवभूमी म्हणून ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातलं इंग्रजांनी वसवलेलं हे हिल स्टेशन. हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणाला चहुबाजूंनी निसर्गसौंदर्याची देणगी लाभली आहे. शहर वसवण्यासाठी जागा निवडताना इंग्रजांची सौंदर्यदृष्टी किती छान होती याचा प्रत्यय तुम्हाला इथे आल्यावर होतो. भारतातल्या सर्वांत पसंतीच्या टुरिस्ट स्पॉटपैकी हा एक आहे. शिवाय इथे 2 दिवस,3 रात्रींच्या मुक्कामाची सोय एखाद्या हॉटेलचं पॅकेज घेतल्यास अवघ्या 5 हजार रूपयांमधेच होते.
3. माऊंट अबू ( राजस्थान)
राजस्थानमधल्या रखरखत्या वाळंवटी प्रदेशातलं हे एकमेव हिल स्टेशन म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. निसर्गसौंदर्यासोबतच इथे जैनांची प्रसिद्ध अशी दिलवाडा मंदिरंही आहेत. पर्यटकांचा कायम ओढा असलेल्या या ठिकाणी हॉटेल्सही खूप महागडी असतील असा विचार जर तुम्ही करत असाल तर थांबा. कारण इथेसुद्धा पाच हजार रूपयांमध्ये 3 दिवस 2 रात्रींचं पॅकेज मिळतं
4. व्हॅली आॅफ फ्लॉवर( उत्तराखंड)
पर्यावरणप्रेमी किंवा निसर्गसौंदर्याचे भोक्ते असाल तर उत्तराखंडमधल्या ‘व्हॅली आॅफ फ्लॉवर’सारखं दुसरं ठिकाण नाही. एकाच ठिकाणी इतक्या प्रकारची फुलं पाहून तुम्ही थक्क व्हाल. वाइल्ड रोज, डेलिया, सैक्सिफेज, ट्युलिप या फुलांच्या अनेक जाती, त्यांचे विविध रंग पाहताना तुम्ही स्वत:ला विसरून जाल. अवघ्या साडेतीन हजार रूपयांत इथे 2 रात्री,3दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.
5. शिलॉंग (मेघालय)
ईशान्य भारताला निसर्गसौंदर्याचा अद्भुत खजिना लाभलेला आहे. त्यातही शिलॉंगला ‘पूर्वाैत्तरचं स्कॉटलण्ड’ असं म्हटलं जातं. महाकाय पर्वंतासोबतच घनदाट जंगलाची सोबत लाभलेला हा सगळा परिसर बजेट ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. आणि हो, तुम्ही जर रॉक म्युझिकचे चाहते असाल तर तुम्ही एकदा तरी शिलाँगला जायलाच हवं. कारण अनेकांना माहित नाही की या छोट्याशा शहराला ‘रॉक कॅपिटल’ म्हणूनही ओळखलं जातं.त्यामुळे ट्रीप प्लॅन करताना बजेटची चिंता असेल तर या ठिकाणांचा विचार जरूर करा. तुमच्या ट्रीपच्या एकूण खर्चात नक्कीच बर्यापैकी बचत होऊ शकते.