- अमृता कदमपरदेशवारी हे अनेकांनी आपल्या उराशी बाळगलेलं स्वप्न असतं. पण परदेशी पर्यटनाला जाण्यापूर्वी जगातल्या पर्यटकांना नेमकं कुठं फिरायला आवडतं? कुठल्या ठिकाणी जगभरातल्या पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. पडला असेल तर याचं उत्तर एका सर्वेक्षणातून नुकतंच समोर आलं आहे.
प्रत्येकजण आपल्या पसंतीनुसारच ट्रिपचे बेत आखत असला तरी जागतिक पातळीवर पर्यटकांची पसंती नेमकी काय आहे ही बाब लक्षात घेतलेलं उत्तमच! हाँगकाँग हे संपूर्ण जगातल्या पर्यटकांचं सर्वांत आवडतं ठिकाण ठरलेलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून हाँगकाँगनं हा प्रथम क्र मांक टिकवून ठेवला आहे. चीनसोबत तणावपूर्ण संबंध असतानाही हाँगकाँगकडे पर्यटकांचा ओढा कमी होत नाहीये हे विशेष.
‘युरोमीटर इंटरनॅशनल’ या मार्केट रिसर्च संस्थेनं नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार 2.5 कोटी पर्यटकांनी या वर्षी हाँगकाँगला भेट दिली आहे. अर्थात 2016च्या तुलनेत हे प्रमाण 3.2 टक्क्यांनी कमी आहे.या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे थायलंडची राजधानी बँकाँकने. पण लक्षणीय बाब म्हणजे हाँगकाँगच्या तुलनेत बँकाँककडे पर्यटकांच्या ओढा गेल्या काही वर्षात वेगानं वाढतोय. 2016 या एका वर्षात इथल्या पर्यटकांमध्ये तब्बल 9.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकाँकमध्ये एका वर्षात 2 कोटी 13 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे.
या यादीत सदाबहार युरोपचा समावेश नसता तरच नवल. लंडन या युरोपमधल्या सर्वात महत्वाच्या शहराचं यादीत तिसरं स्थान आहे. लंडनला एका वर्षात 1 कोटी 98 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. युरोपच्या इतिहासाला उजाळा देणारी अनेक शहरं पाहणं हा एक नॉस्टेल्जिक करणारा अनुभव असतो. त्यामुळेच पर्यटकांच्या लिस्टमध्ये युरोपियन देश असतातच. पण या सर्वेक्षणानुसार लंडनचं तिसरं स्थान सध्या धोक्यात आहे. कारण अनेक आशियाई शहरं या स्पर्धेत शिरकाव करत आहेत. सिंगापूर, मलेशिया या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.
परदेशी पर्यटनाची संधी तुम्हाला मिळेल तेव्हा मिळेल. पण पर्यटनाच्या जगात नेमका काय ट्रेण्ड सुरु आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांची पावलं नेमक्या कुठेला दिशेनं आहेत हे लक्षात घेणंही जास्त महत्त्वाचं. कदाचित हा ट्रेण्ड वाचून तुम्हाला तुमची टूर प्लॅन करायला मदत होईल.