ऋतू कोणताही असो फिरायला जाण्याचा आनंद अनेकांना असतो. आता तर पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच फिरायला जाण्याचं प्लॅनिंन करुन ठेवत आहेत. अनेकांना आपल्या बिझी शेड्यूलमुळे फिरायला जाता येत नाही तर काहींना पैशांच्या कारणामुळे फिरायला जाणं कॅन्सल करावं लागतं. मात्र, सगळं व्यवस्थित प्लॅन केलं तर कमी पैशांमध्येही चांगली ट्रिप होऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच काही कमी खर्चात ट्रिप कशा कराव्या याच्या खास टिप्स...
1) हिशेब असावा क्लिअर
कुठेही जाण्याआधी त्या ठिकाणी जाण्याचा खर्च किती येणार, राहण्याचा खर्च किती येणार, खाण्याचा खर्च किती येणार याची माहिती घेऊन ठेवा. जिथे जाणार असाल तिथे सर्वात स्वस्त पण चांगली सर्व्हिस कुठे मिळते याचीही माहिती आधीच घ्या. जेणेकरुन तुमचा उगाच होणारा खर्च वाचेल आणि तुम्ही नीट प्लॅनिंग करु शकाल. यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता.
2) क्रेडीट कार्ड ठरेल फायद्याचं
यात कुणाचही दुमत नसेल की, पैशांची तत्काळ गरज पडते तेव्हा क्रेडीट कार्ड खूप कामात पडतं. त्यामुळे कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सोबत क्रेडीट कार्ड नक्की ठेवा. यामुळे तुम्ही गरज पडली तर पैसे काढू शकता.
3) आधीपासून करा बचत
कोणतही काम करण्याआधी योग्यप्रकारे योजना आखली तर ते काम अधिक चांगलं होतं. त्यामुळे तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही दिवस आधीपासूनच पैशांची बचत करायला लागा. जर तुम्ही घरी पैसे बचत करु शकत नसाल तर तुम्ही कुणाकडे पैसे देऊन ठेवू शकता.
4) बजेटनुसार ठिकाणांची निवड
तुमच्या जास्त पैसे नसतील पण तरीही आहे तितक्या पैशांमध्ये तुम्हाला फिरायला जायचं असेल तर, त्या बजेटनुसार ठिकाणांची निवड करणे कधीही योग्य. नाहीतर तुमची ट्रिप कॅन्सल झाली म्हणून समजा कारण सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतं पण पैशांचं घेता येत नाही, असे म्हणतात.
5) कशावर किती खर्च
फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करताना तिथे गेल्यावर कशावर किती खर्च करायचा, हे जर आधीच ठरवलं तर तुम्हाला जास्त महागात पडणार नाही. कारण उत्साहाच्या भरात आपण काहीही करतो आणि मग नंतर उगाच स्वत:ला दोष देत बसता. त्यामुळे आधीच सगळं ठरवा.
6) एकावेळी एकच ठिकाण
अनेकांना एकाच ट्रिपमध्ये वेगवेगळी ठिकाणे बघायची असतात. पण जर कमी पैसे असेल तर एकाच ठिकाणी फिरण्याचा प्लॅन केल्याचं काय वाईट? असे केल्यास तुमची ट्रिपही कॅन्सल होणार नाही आणि महत्वाची बाब म्हणजे कमी पैशात होईल.