लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आदरातिथ्य आणि पर्यटन विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी आणि उत्साही सेवा देऊ शकाल, असा सल्ला कोकण विभागाचे उपायुक्त मकरंद देशमुख यांनी व्यक्त केला. पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग आणि नेरूळ येथील डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त नेरूळ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी यावेळी जागतिक पर्यटन दिनाचे महत्व सांगितले. आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे उपक्रम म्हणजे कोकणाच्या पर्यटनाला व्यवसायीक स्वरुप देण्याचा प्रयत्न असून, यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे हेडे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकासासाठी राबाविलेल्या विविध संकल्पना आणि धोरणांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोकणातील पर्यटनासंबंधित पायभूत सुविधा उत्तम आणि दर्जेदार करण्याच्या हेतूने पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज यांच्यात तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जागतिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.