- अमृता कदम
दुबई हे अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. भारतातून दुबईला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही दुबईला जायची तयारी करत असाल तर काही गोष्टींची माहिती नक्की करून घ्या. दुबईची संस्कृती इतर देशांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे इथे फिरण्याचा आनंद घेताना स्वत:वर थोडी बंधनंही घालून घ्यावी लागतात. कारण तुम्हाला आपल्या देशात ज्या गोष्टी अगदीच कॉमन वाटतात कदाचित दुबईमध्ये त्या दंडनीय अपराधाच्या काबिल ठरु शकतात. पर्यटनाला आपण मौजमजेसाठी जात असतो, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक देशाची संस्कृती, तिथल्या धार्मिक संकल्पना या वेगळ्या असतात. त्यांची थोडीफार माहिती असली तर तुमचं त्या देशातलं वास्तव्य हे अधिक आनंददायी ठरु शकतं. आणि इतरांच्या परंपरांचा आदर राखण्याची सहिष्णुताही तुमच्यामध्ये नक्कीच निर्माण होते.
दुबईत कसं वागावं?
* सार्वजनिक ठिकाणी मद्यपान नको
दुबईमध्ये परदेशी व्यक्ती परवाना असेल तर त्यांच्या घरात मद्यपान करु शकते. तुम्ही परवानाप्राप्त हॉटेलमध्येही बसून ड्रिंक्स घेऊ शकता. पण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान...विचारही करु नका! दंडाच्या रु पानं तुमच्या खिशाला मोठी चाट बसू शकते.
* ड्रग्सला एकदम नो!
दुबईमध्ये ड्रग्स बाळगणं किंवा ड्रग्सचा व्यापार करणं हा गुन्हा आहे. काही प्रिस्क्राईब्ड औषधंही दुबईमध्ये बेकायदेशीर मानली जातात. फ्लाईट पकडण्याआधी ड्रग्ज कझ्युंम केली आणि दुबईला पोहचल्यावर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं दंड झाल्याच्याही काही केसेस आहेत.
* रस्त्यावर नाचू नका
आपण फिरायला, मजा करायला आलोय म्हटल्यावर अगदी रस्त्यावर मस्तपैकी गाणी लावून थिरकायला काय हरकत आहे असा विचार करत असाल तर तुमच्या उत्साहास जरा आवर घालाच. कारण दुबईमध्ये असं रस्त्यावर नाचण्यावर पूर्णपणे फुली आहे. त्यामुळे तुमच्या डान्स मूव्हज क्लब आणि डान्स फ्लोअरसाठी राखून ठेवा.
* फोटोग्राफी जरा भान ठेवूनच.
दुबईमध्ये फोटो काढताना थोडंसं भान ठेवा. कारण तिथे रस्त्यावरु न येणाऱ्या -जाणाऱ्या लोकांचे विशेषत: तिथल्या महिलांचे फोटो काढणं हे असभ्यपणाचं मानलं जाऊ शकतं. त्यावरून तुम्हाला कोणी हटकूही शकतं. बाकी पर्यटनस्थळांचे फोटो तर तुम्ही काढूच शकता.
* सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शन नको
तुमचं प्रेम तुमच्या हॉटेलच्या रूमपर्यंतच मर्यादित ठेवा. एकदा दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या एका ब्रिटीश जोडप्याची रवानगी थेट तुरुंगामध्ये झाली होती. त्यामुळे तुमचं प्रेमप्रदर्शन तुम्हाला गोत्यात आणू शकतं.
* भाषेवर नियंत्रण ठेवा
सार्वजनिक ठिकाणी शिवराळ किंवा अश्लील भाषा अजिबात वापरु नका. तसं केल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल हे नक्की. इथल्या सत्ताधाऱ्यांबद्दलही नकारात्मक टिप्पणी करणं टाळलेलीच बरी.
* कपड्यांबद्दल थोडं जागरुक रहा.
खरं तर दुबई हे शॉपिंगसाठीचं उत्तम डेस्टिनेशन आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक उत्तमोत्तम ब्रँडसचे कपडे इथे पहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही हवी तेवढी शॉपिंग करु शकता. मात्र कपडे खरेदी करण्याबाबत काही बंधन नसली तरी दुबईमध्ये फिरताना काय घातलं पाहिजे आणि काय नाही, याचं थोडं भान असणं गरजेचंच आहे.आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असलं तरी दुबईचे स्वत:चे काही नियम आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांचं पालन करणं हे अनिवार्य असतं. त्यामुळेच इथे अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावेत.
* डाव्या हातानं शेकहॅण्ड नाही
इथल्या संस्कृतीनुसार हात मिळवण्यासाठी डावा हात पुढे करणं किंवा एखाद्या व्यक्तीला डाव्या हातानं वस्तू देणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे. त्यामुळे डाव्या हाताला थोडंसं आवरा. आणि जर तुम्ही डावखुरे असाल तर? दुबईला जाण्यापूर्वी उजव्या हातालाही थोडी कामाची सवय लावा!