-अमृता कदमआजकाल परदेशी प्रवास करणा-या भारतीय प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत.
‘ट्रॅव्हल कॉमर्स पोर्टल’ या ट्रॅव्हलपोर्टनं केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.2017 या वर्षांत डिजिटल प्रवाशांच्या यादीत भारतानं पहिलं स्थान मिळवलं आहे. या यादीत चीननं दुसरं स्थान मिळवलं आहे. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती असलेला इंडोनेशिया या यादीत तिस-या क्र मांकावर आहे.19 देशांतल्या पर्यटकांच्या माहितीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. प्रवासाचं नियोजन, तिकिट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि प्रवासातल्या इतर टप्प्यांवर पर्यटक डिजिटल पर्यायांचा अवलंब कसा करतात याचा संदर्भ घेत ही यादी केली आहे.
भारतातून 1000 पर्यटकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. वर्षातून एकदा तरी विमानप्रवास करणा-या प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार या सर्वेक्षणासाठी करण्यात आला.भारतीय प्रवाशांनी दिलेल्या माहितीचा विचार करता स्मार्टफोन हे सर्वाधिक पसंतीचं डिजिटल डिव्हाइस असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 82टक्के भारतीय प्रवाशांच्या मते मोबाइल बोर्डिंग पास आणि इ तिकिट ही जास्त सोयीची असतात.66 टक्के भारतीय वाय-फायसाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या हॉटेल्समध्ये बुकिंग करणं टाळतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लांबचे प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांना आपल्या कुटुंबियांशी तसंच मित्र-मैत्रिणींशी व्हर्च्युअली कनेक्टेड असण्याची आवश्यकता भासते. त्यामुळेच प्रवासाचं नियोजन करताना कनिक्टिव्हिटीचा विचारही केला जातो.
एकूणच आधुनिक तंत्राचा वापर करत आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करण्यात भारतीय प्रवाशांनी आघाडी घेतली आहे, हे नक्की.