इंडोनेशियातील सरकारने आता अधिकृतरित्या घोषणा करून तेथील प्रसिद्ध कमोडो आयर्लन्ड जानेवारी 2020 पासून पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कमोडो बेटावर आढळून येणारी कमोडो ड्रॅगनची प्रजाती सुरक्षित करण्याच्या उद्देशाने असं करत असल्याचे सांगितले आहे. कमोडो ड्रॅगनची प्रजाती लोप पावत असून असं न होऊ देण्यासाठी इंडोनेशिया सरकार असं करत आहे. तसेच येथे राहणाऱ्या लोकांनाही विस्थापित करण्यात येणार आहे.
कमोडो बेटवर विषारी ड्रॅगन असूनही येथे एक गाव आहे. तेथील लोक कोणतीही भिती न बाळगता वर्षानुवर्ष येथे राहत आहेत. तेथील लोकांचं असं म्हणणं आहे की, या ड्रॅगन्ससोबत त्यांचं अध्यात्मिक नातं आहे. मान्यतेनुसार, एक ड्रॅगन राजकुमारी होती. तिने एका ड्रॅगनला आणि एका मुलाला जन्म दिला होता. या कारणामुळे ड्रॅगनसोबत यांचं एक वेगळं नातं तयार झालं आहे.
(Image Credit : Lonely Planet)
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कमोडो बेटावर जवळपास 1700 कमोडो ड्रॅगन आहेत. परंतु, मागील काही वर्षांमध्ये शिकारी आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पर्यटनामुळे त्यांच्या संख्येमध्ये कमतरता होत आहे. यांच्या जीवनशैलीमध्ये वाढत्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही प्रजाती हळूहळू विलूप्त होण्याच्या मार्गावर आहे.
कमोडो बेट आणि त्याला जोडून असणारं नॅशनल पार्क फिरण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये पर्यटक येथे पोहोचतात. आकड्यांनुसार, 2018मध्ये कमोडोची सैर करण्यासाठी 1 लाख 76 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कमोडो बेट पर्यटकांसाठी 12 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. यानंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुलं करण्यात येईल. परंतु, कदाचित येथे येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्कही आकारण्यात येणार आहे. अशा स्थितीमध्ये पर्यटक येथे येऊ शकतील.