देशाची राजधानी दिल्ली म्हटले कि नजरेसमोर प्रथम राजपथ आणि त्यावर दिमाखाने उभे असलेले इंडिया गेट येते. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकांना सुद्धा या स्थळाला भेट देण्याची उत्सुकता असते. १२ फेब्रुवारी १९३१ साली पूर्ण झालेले हे स्थळ भारताची विरासत आहे. या वास्तूविषयी काही रोचक माहिती आमच्या वाचकांसाठी.
पहिले महायुद्ध आणि तिसरे अँग्लो अफगाण युद्ध यात ब्रिटीश इंडियन आर्मी मधील ९० हजार सैनिकांनी ब्रिटीश साम्राज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या सन्मानार्थ ही वास्तू उभारली गेली असून या गेटच्या भिंतींवर या शहीद सैनिकांची नावे कोरली गेली आहेत. देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वी इंडिया गेट समोर फक्त किंग जॉर्ज पाचवा याची प्रतिमा होती पण स्वातंत्र मिळाल्यावर ही प्रतिमा हटविली गेली.
विशेष म्हणजे जेथे हे स्मारक आज उभे आहे तेथे पूर्वी रेल्वे लाईन होती. १९२० मध्ये जुनी दिल्ली हे एकमेव रेल्वेस्टेशन अस्तित्वात होते आणि येथून आग्रा येथे जाण्यासाठी रेल्वे होती. तिचा मार्ग येथून होता. इंडिया गेटची उभारणी करण्याचा निर्णय झाला तेव्हा प्रथम ही रेल्वे लाईन हालवून यमुना नदीकाठी नेली गेली आणि मग बांधकाम सुरु झाले. हे गेट लाल बलुआ दगड आणि ग्रॅनाईट मध्ये बांधले गेले असून ते ४२ मीटर उंच आहे. हे बांधकाम पूर्ण व्हायला १० वर्षे लागली. एडविन ल्युटीयंस यांनी पॅरीसच्या आर्क ऑफ ट्रायम्फ वरून प्रेरणा घेऊन या गेटचे डिझाईन केले होते असे सांगतात.
या गेटच्या अगदी जवळ काळ्या संगमरवर दगडात बांधलेले एक मंदिर असून तेथे एलआयएएफ सेल्फ लोडिंग रायफल आणि त्यावर सैनिकाचे हेल्मेट आहे. याला अमरज्योती जवान स्मारक म्हणतात. ७१ च्या पाकिस्तान युद्धात बांग्लादेशाच्या बाजूने लढताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेल्या या स्मारकाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी ७२ ला केले होते.