राजस्थान हे पर्यटकांचे आवडते राज्य आहे. येथील किल्ले, महाल, शहरे, वाळवंट यांची अनोखी शान आहे. राजधानी जयपूरला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. पिंक सिटी अशी ओळख असलेल्या या शहरातील हवामहल त्याच्या अद्भूत वास्तुकला, इतिहास आणि डिझाईन मुळे पर्यटकांना आकर्षित करतो. गुलाबी रंगाचे सज्जे, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम हा महाल पाहण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. या महालाविषयी काही रोचक माहिती वाचणे आमच्या वाचकांना नक्कीच आवडेल.
सर्वप्रथम या महालाचा आकार पाहू. तो एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे. राजा सवाई प्रतापसिंग मोठे कृष्णभक्त होते आणि त्यामुळे या महालाचा आकार कृष्णाच्या मुकुटासारखा आहे असे सांगितले जाते. पाच मजली इमारत असलेल्या या महालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात उंच महाल मानला जातो. पाया नसल्याने हा महाल घुमावदार आणि ८७ अंशात झुकलेला आहे. याचा गुलाबी रंग बलुआ दगडांच्या मुळे आहे. हे दगड गुलाबी रंगाचे असतात.
या महालाची उभारणी खास स्त्रीवर्गासाठी, त्यातही राजघराण्यातील महिला वर्गासाठी केली गेली होती. या महालाला ९५३ खिडक्या आहेत. यातूनच राजघराण्यातील स्त्रिया रस्त्यावर चाललेली नृत्ये, लोककला पाहू शकत आणि शहराचा नजराही पाहू शकत.
हवामहाल मध्ये आत गेले की मुघल शैली आणि राजपूत शैलीचा सुंदर संगम दिसून येतो. कमानी, महिरपी मुघल शैलीमध्ये आहेत तर खांब, छतऱ्या, फुलांचे डिझाईन राजपूत शैलीचे आहे. पाच मजली या महालात जिने नाहीत तर रँप आहेत. हा महाल सिटी पॅलेसचा एक हिस्सा म्हणून बांधला गेला होता त्यामुळे बाहेर प्रवेशद्वार नाही. पॅलेस मधूनच आत हवामहल येथे जाता येते.
राजस्थानात उन्हाळा अतिशय कडक असतो. मात्र हवामहाल उन्हाळ्यात सुद्धा विशेष तापत नाही. या महालाला असलेल्या असंख्य खिडक्यातून गार वारा आत येत राहतो आणि त्यामुळे हा महाल तापत नाही. हवामहल हे नाव या महालाच्या पाचव्या मजल्याच्या नावावरून दिले गेले आहे. या महालाच्या ५ व्या मजल्याला हवामंदिर म्हटले जाते. या महालात गोवर्धन कृष्ण, प्रकाश मंदिर आणि हवामंदिर अशी तीन मंदिरे आहेत.