मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
अलीकडच्या काळात विमान प्रवासाचे गगनाला भिडलेले दर लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन बहुतांश लोकांनी आतापासूनच करायला घेतले आहे. साधारणपणे नियोजन करताना लोक आपल्याला कुठे जायचे आहे, ते पहिले निश्चित करतात आणि त्यानंतर तेथील प्रवासाची तिकिटे, राहण्याची-फिरण्याची आदी व्यवस्था करतात. अर्थात, हे करताना या प्रवासासाठी बजेटही निश्चित झालेले असतेच. मात्र, यंदा प्रवासाचे नियोजन करताना पहिल्यांदा तुमचे बजेट निश्चित करा. कुठे प्रवास करायचा ते मात्र पहिल्या फटक्यात निश्चित करू नका. कारण तुमच्या बजेटमध्ये कदाचित देशातील एका पर्यटनस्थळाच्या तुलनेत परदेशातील एखाद्या उत्तम ठिकाणी तुम्हाला फिरण्याची संधी मिळू शकेल. ती कशी, त्याचाच हा सारांश...
परदेशी प्रवास स्वस्त आहे का?
सध्या भारतातील विमान प्रवास दर विचारात घेतले तर त्या तुलनेमध्ये पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या काही देशांतील विमान प्रवासाचे दर कमी आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक भारतीय तसेच परदेशी विमान कंपन्यांनी परदेशात प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्यातही भारतीय विमान कंपन्या सध्या परदेशातील सेवा वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांच्यातर्फे देखील घसघशीत सूट योजना जाहीर होत आहेत.
परदेशात भारतीयांची पसंती कोणत्या देशांना?
मलेशिया, मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ यासह जगातील लहानमोठ्या ६२ देशांत प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही. त्यामुळेच यापैकी बहुतांश देशात पर्यटनासाठी जाण्यास भारतीय लोक उत्सुक आहेत.
व्हिसापोटी प्रति माणसी किमान तीन हजार ते सात हजार रुपये आजवर खर्च होत होता. त्यामध्ये बचत होत असल्यामुळेच लोक नमूद देशांना प्राधान्याने पसंती देत आहेत. याखेरीज, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँडस्, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, युके, अमेरिका येथे जाणाऱ्या भारतीयांची संख्या देखील लक्षणीय आहे.
देशातील प्रवास का महागला?
२०१४ पासून आतापर्यंत सरत्या दहा वर्षांत देशामध्ये ७५ नवीन विमानतळांची उभारणी झाली आहे. विमान प्रवासाची सुविधा अधिकाधिक उपलब्ध झाल्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी लोकही विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत.