-अमृता कदम.पूर्वी ट्रीप प्लॅन करायची म्हटलं की हिलस्टेशन गाठायचं हे ठरलेलं असायचं. पण आता फिरण्याचे वेगवेगळे पर्याय शोधण्याकडे पर्यटकांचा कल वाढतोय. त्यातूनच बेटांवर फिरायला जाण्याचा नवीन ट्रेण्ड सध्या वाढताना दिसतो. निळाशार समुद्र, पायाखाली गुदगुल्या करणारी मऊशार वाळू, समुद्रावरून वाहणारा वारा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या रूटिनमधून आपल्याला हवी असलेली शांतता आणि समाधान...अजून काय हवं? B2C, यात्रा डॉट कॉमचे सीईओ शरत धल यांच्या मते ‘गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांची पसंती ही ‘आयलंड ट्रीप’ला मिळत आहे. नेहमीच्याच समुद्रकिनार्यावर फिरायला जाण्याऐवजी देशी आणि विदेशी बेटांना पर्यटक प्राधान्य देताहेत.’’अंदमान, दीव, गोव्याजवळचं दिवर बेट, लक्षद्वीप बेटं आणि रोस ही भारतातली बेटं तर बाली, बहामा, मालदीव, सेशेल्स आणि फिजी ही परदेशी बेटं पर्यटकांच्या पसंतीमध्ये आघाडीवर आहे.
बिग ब्रेक्स डॉट कॉमचे कपिल गोस्वामी यांनी या यादीत ग्रीक बेटांचाही आवर्जून उल्लेख केला. सध्याच्या काळात ग्रीसमधली बेटंही पर्यटकांना स्वत:कडे खेचून घेत आहेत. कपिल गोस्वामी यांच्या मते इथलं एकही ठिकाण असं नाही की जे पाहून तुम्ही निराश व्हाल. या बेटांना अप्रतिम सौंदर्याचं वरदान आहे. शिवाय प्रवासखर्चही बजेटमधलाच आहे. आठ दिवस आणि सात रात्रींचा ग्रीक बेटांवरच्या ट्रीपचा एका माणसासाठी येणारा खर्च आहे 42,499 रु पये. शिवाय फ्लाईट कनेक्टिव्हिटीही उत्तम आहे. आणि त्या देशांतील स्थानिक विमानकंपन्या भारतातील पर्यटनाचं मार्केट हेरु न वेगवेगळ्या योजनाही जाहीर करतात.परदेशी बेटांवरच्या पर्यटनाला चालना मिळण्यातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिसा. आधीच व्हिसाच्या झंझटींपेक्षा मालदीव, मॉरिशस, सेशेल्स आणि रियुनियन बेटांवर पोहचल्यावर तुम्हाला व्हिसा मिळतो. म्हणजे व्हिसा आॅन अरायव्हल!
कॅरेबियन बेटं
बेटांवरच्या पर्यटनामध्ये क्रूझिंग हा एक आकर्षणाचा विषय आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रूझ लायनर्स त्यांच्या फिरण्याच्या ठिकाणांच्या यादीत वेगवेगळ्या बेटांचा समावेश करतात. TIRUN चे सीईओ वरु ण चढ्ढा सांगतात, ‘क्रूझिंगसाठी कॅरेबियन बेटंही ही सर्वांत लोकप्रिय आहेत. क्रूझवरच्या आकर्षक सहलींमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅरेबियन बेटांना भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कॅरेबियन बेटांच्या समूहातली काही प्रसिद्ध बेटं म्हणजे सेंट मार्टीन, सेंट किट्स, बार्बाडोस, सेंट थॉमस आणि सॅन जुआन. सुंदर समुद्रकिनार्यासोबतच वॉटर स्पोर्टस आणि अॅडव्हेंचर स्पोर्टस हीदेखील इथली खासियत आहे.’
फिजी बेटं
फिजी बेटं ही देखील अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य आहेत. ही बेटं ‘जगातील प्रवाळांची राजधानी’ म्हणून ओळखली जातात. पामची झाडं, शुभ्रं वाळूचे समुद्रकिनारे आणि तुम्हाला हवा असलेला एकांत! सर्व काही आहे इथे. पण 332समूहांच्याया बेटांना जागतिक तापमानवाढीचा फटका बसला आहे. त्यामुळेच दरवर्षी मोठ्या संख्येने येणार्या पुरांमुळे ही बेटं पाण्याखाली जातात.
आॅस्ट्रेलिया आणि सिंगापूरातली बेटं
कोकोस कीलींग बेटं हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. पण आॅस्ट्रेलियातलीही पर्यटकांची पावलं न वळलेली बेटं स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली आहे. 27 बेटांचा हा समूह प्रवाळ बेटं आहे. इथल्या ट्रीपचा एका माणसासाठीचा खर्च साधारणपणे 1,20,000रु पयांच्या घरात जातो.पुलावू उबिन ही सिंगापूरजवळची बेटं. त्यामुळे सिंगापूरला जायचा बेत असेल तर थोडी वाट वाकडी करा आणि या बेटांनाही नक्की भेट द्या.तुमच्या या यादीत अजूनही काही नावांची भर तुम्ही घालू शकता. पण नुसती यादी करु न थांबू नका, तर त्यातल्या एखाद्या तरी सुंदरशा बेटाला आवर्जून भेट द्या.