ताजमहाल हा जगभरात प्रेमाचं प्रतीक म्हणून लोकप्रिय आहे. शहाजहाने मुमताजसाठी बांधला होता. पण देशात असंच एक प्रेमाचं प्रतीक असलेलं ठिकाण आहे. जे फार कमी लोकांना माहीत आहे. हरयाणातील झज्जरमधील हसन तलाव असंच प्रेमाचं प्रतीक म्हणून लोकप्रिय आहे. चला जाणून घेऊ या तलावाची कहाणी....
झज्जरमधील बुआ हसन तलाव पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येतात. महत्त्वाची बाब म्हणजे हा तलाव तयार करण्याची कहाणी सुद्धा ताजमहाल इतकीच रोमांचक आहे. आजपासून साधारण ३८० वर्षांआधी झज्जरच्या सिलानी क्षेत्रातील मुस्तफाची मुलगी बुआ आणि एका लाकुडतोड्या मुलगा हसन यांच्यात प्रेम झालं. पण त्यांच्या नशीबात हे प्रेम नव्हतं. पण आजही हा तलावा या दोघांची प्रेमकहाणी दर्शवतो.
१६३५ मध्ये सुरू झाली होती प्रेमकहाणी
१६३५ मध्ये एका सायंकाळी १६ वर्षीय बुआ तिच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊ बाहेर पडली होती. असे मानले जाते की, घोडेस्वारीमध्ये कुशल बुआ फारच पुढे निघून गेली. ती जंगलात पोहोचली आणि अचानक एका वाघाने तिच्यावर हल्ला केला. हे बघून बाजूलाच लाकडं तोडणाऱ्या हसनने बुआचा वाघापासून बचाव केला. त्याने वाघाला ठार केले. यात बुआ गंभीर जखमी झाली होती.
(Image Credit : yaadsafarki.blogspot.com)
हसनचा जीव गेला
या जखमी अवस्थेत जेव्हा हसन बुआला तिच्या घरी घेऊन गेला तेव्हा मुस्तफाने हसनचे आभार मानले. त्याला थांबण्यासही सांगितले. दुसऱ्या दिवशी हसनला त्याची इच्छा विचारली गेली. त्याने थेट बुआशी लग्नाची मागणी केली. त्यांच्या लग्नाला परवानगी सुद्धा मिळाली. त्यानंतर दोघेही जंगलाजवळील त्याच तलावाजवळ भेटत होते. काही दिवसांनी मुस्तफाने हसनला राजाच्या सेनेत भरती होण्यास सांगितले. त्यानंतर त्याला एक दिवस युद्धावर पाठवण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी बुआला कळाली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने तलावाजवळ हसनची समाधी तयार केली. त्यानंतर अनेकदा बुआ तिथे एकटी जात असे. त्यानंतर २ वर्षांनी तिने हसनच्या आठवणीत देहत्याग केला. बुआला सुद्धा हसनच्या समाधीजवळ दफन करण्यात आलं.
कसे पोहोचाल?
नवी दिल्लीहून हरयाणामध्ये स्थित झज्जरचं अंतर ५६ ते ६० किमी आहे. नवी दिल्लीहून हरयाणा जाणाऱ्या बसेस झज्जरला जातात. तुम्ही टॅक्सीनेही झज्जरला पोहोचू शकता.