असे म्हणतात की, रस्ता सुंदर असला तर प्रवास चांगला होतो. प्रत्येकाची प्रवासाची वेगळी आवड असते. कुणाला हिरवीगार झाडे आणि डोंगर बघत ट्रेनने प्रवास करायचा असतो तर काहींना बाइकने प्रवास करणे पसंत असतं. ज्यांना रोड ट्रिपची आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही काही खास रोडची माहीत घेऊन आलो आहोत. हे हायवेंना भारतातील सर्वात सुंदर हायवे मानले जाते. या रस्त्यांवरुन प्रवास करणे तुमच्यासाठी यादगार होईल.
१) मनाली ते लेह
कदाचित या रोडवरून केलेल्या प्रवासाला भारतातील सर्वात सुंदर प्रवास म्हणता येईल. या रोडवरून प्रवास करणे तुमच्यासाठी फार वेगळा अनुभव असेल. बर्फाने झाकलेले उंचच उंच डोंगर आणि रस्ता तुमचा हा प्रवास नेहमीसाठी यादगार करेल. तसा तर लेहला जाण्यासाठीचा रस्ता वर्षातून केवळ ५ महिन्यांसाठीच खुला असतो. पण तरीही एकदा हा रस्त्यावरील प्रवास अनुभवायला हवा.
२) मुंबई ते पुणे
मुंबई ते पुणे हा प्रवासही अनेक सुंदर प्रवासांपैकी एक मानला जातो. कारण या रस्त्याने जाताना सुंदर डोंगर-दऱ्या, लोणावळा-खंडाळा घाट तुम्हाला वेगळाच अनुभव देतो. मुंबईच्या गर्दीतून दूर जरा मोकळा श्वास घेण्यासाठी विकेंडला तुम्ही या रस्त्यावर प्रवास करू शकता. खासकरून पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास तुमच्या नेहमी लक्षात राहिल.
३) शिमला ते मनाली
अनेकजण आपल्या सुट्ट्यांमध्ये फिरायला किंवा नवीन जोडपी हनीमूनसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. जर तुमचाही असाच काही फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर शिमला ते मनाली रोड ट्रिप जरूर करा. या रस्त्यावरुन केलेला प्रवास तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जवळ आणेल. उंचच उंच झाडे, बर्फाने झाकले गेलेले डोंगर तुमच्या डोळ्यांना अद्भूत अनुभव देतील. तुमचा हा २५० किमीचा प्रवास आयुष्यभरासाठी तुमच्या लक्षात राहील.
४) गुवाहाटी ते तवांग
चहाच्या बागा आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुवाहाटीवरूनही तुम्ही तुमचा यादगार प्रवास सुरु करू शकता. गुवाहाटी ते तवांग हा प्रवास तुम्हाला कधीही न अनुभवलेल्या निर्सगाचा अनुभव देईल. येथील वळणदार रस्ते, ढगांनी घेरले गेलेले डोंगर यामुळे तुमचा प्रवास एखाद्या स्वप्नासारखाच होईल. या रस्त्यावर गाडी चालवणे तसे अवघड काम आहे. कारण ढगांमुळे रस्त्यावर समोरचं काहीच दिसत नाही. पण तरीही कमी ढग असताना तुम्ही येथून प्रवास करू शकता.
५) चेन्नई ते मुन्नार
जर तुम्ही चेन्नईला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडा वेळ काढून मुन्नारला जायला विसरू नका. कोयम्बटूरपासून ९० किमी अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन हे जन्नत म्हणूनही ओळखलं जातं. मुन्नारला जाताना लागणारा रस्ता तुम्हाला नक्की आवडेल. चारही बाजूंनी हिरवळ आणि उंच डोंगर तुमच्या डोळ्याचं पारणं फेडतील.