ऑफिसच्या धावपळीतून थोडावेळ बाहेर पडायचं असेल आणि टेन्शन फ्री होऊन शांत वेळ घालवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधून आणलं आहे. या ठिकाणाबाबत तुम्ही फार ऐकलं नसेल. कारण इथे ना फार जास्त गर्दी असते ना जास्त लोकांना हे ठिकाण माहीत आहे. इथे तुम्हाला केवळ शांतता आणि निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळेल. नेहमीच्या धावपळीच्या जीवनाला विसरून एका वेगळ्याच विश्वात शिरायचं असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट ठरेल. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण.
कुठे आहे हे ठिकाण?
हिमाचल प्रदेशमधील कल्पा हे ठिकाण आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे. कारण इथे इतकं काही आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. तसं या ठिकाणावर राहणं थोडं कठिण आहे. पण अशक्य नाही आणि तुम्हाला हवी असलेली शांतता जर इथे मिळणार असेल तर त्यासाठी थोडा त्रास करून घेण्यात काय गैर. रोमांचक ट्रिपची आवड असणाऱ्यांना हे ठिकाण नक्कीच आवडेल.
तुम्हाला हवी असलेली शांतता
तुम्ही कधीही न अनुभवलेली आणि तुम्हाला हवी असलेली शांतता इथे अनुभवायला मिळेल. कल्पा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून २९६० मीटर उंचीवर स्थित एक छोटं गाव आहे. कल्पा येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हे शिमला आहे. हे स्टेशन कल्पापासून साधारण २४४ किमी अंतरावर दूर आहे. आधी कल्पा किन्नोर जिल्ह्याचं मुख्यालय होतं. पण आता रिकांग पियो किन्नोरचं मुख्यालय आहे. शिमल्याहून तुम्हाला रिकांग पियो आणि कल्पासाठी सहज टॅक्सी मिळू शकते.
काय आहे खासियत?
कल्पा हे एक डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटं सुंदर गाव आहे. इथे तुम्हाला शिमला, मनाली आणि नैनीतालसारखी गर्दी मिळणार नाही. तुम्हाला इथे केवळ शांतता मिळेल. तसेच येथून तुम्हाला कैलाश पर्वतावरील सुंदर नजारा बघायला मिळेल. त्यासोबतच इथे सफरचंदाच्या बागाही आहेत. या बागा येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय आहे. तसेच इथे तुम्ही बौद्ध मठ आणि मंदिरेही बघू शकता.
ट्रेकिंगशिवाय ट्रिप अपूर्ण
गावातील चौकातून तुम्ही जर वरच्या दिशेने जाल तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळेल. येथून तुम्ही दुसऱ्या गावांचा सुंदर नजाराही बघू शकता. त्यासोबतच तुम्ही इथे ट्रेकिंगही करू शकता. इथे येऊन ट्रेकिंग नाही केलं तर तुमची ट्रिप अर्धवट राहील. त्यामुळे कल्पापासून रोघी गावापर्यंत ५ किमी अंतराचा ट्रेक करा. हा अनुभव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहील. इथे तुम्हाला कमी दरात हॉटेलही मिळू शकतात.