अनेक लोक दरवर्षी बद्रीनाथ आणि केदारनाथला जाण्यासाठी प्रयत्न करतात. काहींना शक्य होतं, पण काहींना ते शक्य होत नाही. त्यामुळे ते पुढच्या वर्षीची वाट पाहतात. पण तुम्ही यावर्षी केदारनाथला जाण्याची तयार करत असाल, तर तुमच्या प्लॅनमध्ये थोडासा बदल करा. फक्त देवदर्शन करण्याच्या उद्देशाने आपल्या ट्रिपचं प्लॅनिंग करू नका. कारण केदारनाथच्या आजूबाजूला फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे देवदर्शनासोबत तेथील निसर्गसौंदर्यही पाहू शकता. येथील अनेक ठिकाणं नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात.
केदारनथजवळ असलेली 5 सुंदर ठिकाणं :
केदारनाथपासून काही अंतरावर अत्यंत सुंदर ठिकाणं आहेत. या ठिकाणांवर कोणतीही धार्मिक स्थळं नसून तुम्ही येथे अॅडव्हेंचर्स आणि निसर्गाचा आनंद लुटू शकता. भगवान शंकराचं दर्शन घेऊन तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. तुमची ही केदारनाथ यात्रा एकदम पैसा वसूल होईल. जाणून घेऊया केदारनाथच्या आजूबाजूला असलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या 5 खास ठिकाणांबाबत....
(Image Credit : Trawell.in)
1. गांधी सरोवर
केदारनाथपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे गांधी सरोवर. या ठिकाणाला गांधी ताल आणि चोराबरी तालाच्या नावानेही ओळखलं जातं. हे सरोवर सुंदर पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. येथील किनाऱ्यावर अनेक लोक फिरण्यासाठी येत असतात. अनेक लोक येथे योग-मेडिटेशनसाठीही येत असतात.
2. मयाली पास ट्रेक
डोंगर-दऱ्यांमध्ये जाणार आणि ट्रेकिंगचा आनंद नाही घेतला तर तिथे जाण्यात अर्थच नाही. मयाली पास ट्रेक केदारनाथपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही गाडीने येथे फक्त अर्ध्या तासात पोहोचू शकता. येथे जात असाल तर अॅडव्हेंचर स्पोर्ट्स अॅक्टिविटिजचा आनंद घेऊ शकता.
(Image Credit : Trawell.in)
3. वासुकी सरोवर
केदरनाथच्या आजूबाजूला अनेक लहान-लहान सरोवर आहेत. परंतु यांपैकी वासुकी सरोवर सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हे सरोवर समुद्राच्या तळापासून जवळपास 4135 मीटर उंचावर आहे. याच्या आजूबाजूला सुंदर आणि विशाल डोंगर आहेत. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम डेस्टिनेशन आहे. येथे येऊन अनेक लोक मेडिटेशनही करतात.
4. सोनप्रयाग
गौरीकुंडपासून 4 किलोमीटर आणि केदारनाथपासून 18 किलोमीटर अंतरावर स्थित आहे सुंदर असं सोनप्रयाग. येथ दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. सोनप्रयागपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर त्रियुगीनारायण नावचं ठिकाण आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की, येथे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता.
(Image Credit : TripAdvisor)
5. देवरिया सरोवर
केदारनाथपासून 56 किलोमीटर आणि गौरीकुंडपासून 59 किलोमीटर अंतरावर देवरिया सरोवर आहे. इतर सरोवरांपेक्षा अत्यंत सुंदर आणि डोंगरांनी वेढलेलं आहे. सरोवरापासून काही अंतरावर छोटसं गाव 'सारी' आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगही करू शकता.