(Image Credit : www.silverlinetours.com)
२०१८ वर्ष सरलं आणि २०१९ सुरु झालं त्यामुळे अनेकजण २०१९ मध्ये फिरायला जाण्यासाठी लॉन्ग विकेंडचा शोध घेत आहेत. २०१८ मध्ये मित्र आणि परिवारासोबत फिरण्याची अनेकांनी चांगलीच मजा केली. कारण २०१८ मध्ये एकूण १६ लॉन्ग विकेंड मिळाले होते. याचा भरपूर फायदा घेत अनेकांनी चांगलंच एन्जॉय केलं. पण आता २०१९ हे वर्ष लॉन्ग विकेंडबाबत तितकं चांगलं नसणार आहे. तसेच हे लॉन्ग विकेंडही वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुट्टीच्या पॉलिसीवर अवलंबून असतं. त्यामुळे या नव्या वर्षात लोकांना सुट्टी कमी घेता येईल आणि काम जास्त करावं लागणार आहे.
योग्य प्लॅनिंग ठरेल फायद्याचं
विकेंडसोबत ३ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची सुट्टी हवी असेल तर कर्मचाऱ्यांना २०१९ मध्ये फार प्लॅनिंग करावं लागणार आहे. त्यांना जास्त सुट्टी घेण्याची गरज पडू शकते. एप्रिलमध्ये २०१९ मध्ये आणि ऑगस्ट २०१९ मध्ये सर्वात जास्त सुट्टी मिळतील, पण यासाठी लोकांना काही दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल. तेव्हाच लोक लॉन्ग विकेंड एन्जॉय करु शकतील.
जानेवारी
२०१९ मध्ये पहिला लॉन्ग विकेंड १२ जानेवारीला सुरु होणार आहे. म्हणजे शनिवार त्यानंतर १३ जानेवारीला रविवार आणि सोमवारी १४ जानेवारील मकर संक्रात आणि पोंगलची सुट्टी आहे.
मार्च-एप्रिल
मार्च महिन्यात २१ मार्चला होळी आहे. २२ मार्चला तुम्ही सुट्टी घेऊ शकता. त्यानंतर २३ मार्चला शनिवार आणि २४ ला रविवार आहे. एप्रिलमध्ये १७ एप्रिलला महावीर जयंतीची सुट्टी असेल. त्यानंतर एक दिवसाची सुट्टी घेऊ शकता. नंतर १९ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आणि नंतर २० एप्रिलला शनिवार आणि २१ एप्रिलला रविवार आहे. अशाप्रकारे एप्रिलमध्ये तुम्हाला लॉन्ग विकेंड मिळू शकतो.
मे - जून
मे महिन्यातही काही प्लॅनिंग करता येऊ शकतं. ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. त्यानंतर १० मे रोजी एक सुट्टी घ्यावी लागेल. ११ ला शनिवार आणि १२ ला रविवार आहे. जून महिन्याची सुरुवातच विकेंडने होणार आहे. पाच जूनला ईद आहे. तीन आणि चार तारखेला सुट्टी घेऊन तुम्ही ५ दिवसांचा लॉंन्ग विकेंड प्लॅन करु शकता.
ऑगस्टमध्ये जास्त संधी
लॉन्ग विकेंडसाठी ऑगस्ट महिना जरा अधिक चांगला आहे. कारण १० ऑगस्टला शनिवार, ११ ला रविवार आणि सोमवारी १२ तारखेला बकरी ईद आहे. त्यानंतर १५ ऑगस्ट, १६ तारखेला तुम्ही सुट्टी घेऊ शकता आणि नंतर पुन्हा शनिवार आणि रविवार तुम्हाला सुट्टी मिळू शकते.
ऑक्टोबर
ऑक्टोबर महिन्यातही तुम्हाला काही सुट्ट्या घेऊन लॉन्ग विकेंड एन्जॉय करता येऊ शकतो. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आहे. म्हणजे ३ आणि ४ ऑक्टोबरला तुम्ही सुट्टी घेतली तर ५ ला शनिवार आणि ६ ला रविवार पडतो. त्यानंतर ७ तारखेला सोमवारी रामनवमी आहे आणि ८ ऑक्टोबरला मंगळवारी दसरा आहे. त्यानंतर २६ आणि २७ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार येतो. त्यानंतर सोमवारी २८ तारखेला दिवाळी आणि २९ तारखेला भाऊबीज आहे.