जगात अनेक ठिकाणे अशी आहेत कि ज्या गावातून दोन देशांच्या सीमा जातात. असे गाव पाहण्याची इच्छा असेल तर आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. भारताच्या नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यात असलेले लोंगवा गाव असेच अनोखे गाव आहे. नागालँडच्या उत्तर भागात ११ जिल्ह्यातील मोठा जिल्हा असलेल्या मोन मधल्या या गावात एक घर तर असे आहे की, ज्यात झोपायची खोली भारतात आणि स्वयंपाकघर म्यानमार मध्ये आहे. या गावातूनच या दोन्ही देशांची सीमा रेषा जाते. त्यामुळे येथील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व आहे आणि कोणत्याही व्हिसा शिवाय हे नागरिक दोन्ही देशात मुक्त फिरू शकतात. कोन्याक जनजातीची वस्ती या भागात आहे.
येथील गावकरी अतिशय मनमिळावू आहेत. काही स्थानिक म्यानमारच्या लष्करात आहेत. कोन्याक ही जात हेडहंटर म्हणून ओळखली जाते. १९६० च्या दशकात डोके उडविणे हि येथील लोकप्रिय प्रथा होती. अनेक गावकऱ्याकडे पितळ्याच्या माळात गुंफलेल्या कवट्यांचे हार आहेत. असे हार युद्धाच्या विजयाचे प्रतिक मानले जातात.
येथील राजा गावाचा मुखिया असून त्याला ६० बायका आहेत. म्यानमार आणि अरुणाचल मधील ७० हून अधिक गावांवर या राजाचे वर्चस्व आहे. येथे प्रचंड प्रमाणावर अफू सेवन केले जाते. मात्र अफूची लागवड येथे होत नाही तर म्यानमार मधून तस्करी करून अफू येथे येते. पूर्वोत्तर भारतातले हे ठिकाण एक चांगले पर्यटनस्थळ आहे. शांत वातावरण, हिरवागार निसर्ग, मनमिळावू लोक, शिवाय नागालँड सायन्स सेंटर, डोयांग नदी, शिलोई सरोवर, हॉंगकॉंग मार्केट अशी अनेक भेट द्यावी अशी ठिकाणे येथे आहेत. या गावाला जाण्यासाठी मोन पर्यंत नागालँड परिवहन बस आहे, त्यापुढे खासगी वाहनाने जावे लागते.