पर्यटन किंवा भटकंतीची आवड असणारे भटके सतत नवनवीन जागांच्या शोधात असतात. देश विदेशातील अश्या जागांचे त्यांना नेहमीच आकर्षण असते. जगात अनेक देशात अशीही काही रहस्यमय ठिकाणे आहेत जेथील रहस्ये आजही उलगडली गेलेली नाहीत. द. अमेरिकेतील पेरू या देशात असलेले माचूपिचू हे शहर त्याला अपवाद नाही.
जगातील सात आश्चर्यात हे ठिकाण सामील आहे. समुद्रसपाटीपासून ८ हजार फुट उंचावर वसलेले हे रहस्यमय शहर गेली शेकडो वर्षे विराण पडले आहे. प्राचीन इंका संस्कृतीचे हे ऐतिहासिक स्थळ. उरूबाम्बा घाटातील पहाडावर वसलेले हे शहर इंकाचे हरविलेले शहर म्हणून जसे ओळखले जाते तसेच पेरूचे ऐतिहासिक देवालय म्हणूनही ओळखले जाते. १९८३ मध्ये युनेस्कोने माचूपिचू ला जागतिक वारसा यादीत सामील केले आहे. हे रहस्यमयी शहर जगापुढे आणण्याचे श्रेय अमेरिकन इतिहासकार हिराम बिन्घम याना दिले जाते. त्यांनी १९११ मध्ये हे शहर शोधले होते. आज हे महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे.
हे शहर १४५० इसवीपूर्व मध्ये वसविले आणि १०० वर्षातच स्पेनने येथे विजय मिळविल्यावर ही जागा त्यावेळच्या लोकांनी सोडूनच दिली असे मानले जाते. तेव्हापासून हे ठिकाण विराण बनले आहे. या शहराची निर्मिती नरबळी देण्यासाठी झाली असावी असा अंदाज आहे कारण येथे हजारो सांगाडे मिळाले आहेत. त्यात महिलांचे सांगाडे जास्त प्रमाणात आहेत.
इंका सूर्यपूजक होते आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी कुमारी मुलीचा बळी देत असत असेही म्हटले जाते. अन्य एका दाव्या नुसार हे शहर एलियन्स म्हणजे परग्रहवासीनी वसविले आणि नंतर ते शहर सोडून गेले असेही मानले जाते.