भारतात अनेक रहस्यमयी, अनोखी आणि चमत्कारी मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरांचे रहस्य आजही रहस्यच आहे. झारखंड राज्यातील गुमान जिल्यात हपामुनी नावाच्या गावात असलेले महामाया मंदिर हे त्यातील एक. या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. कारण ही मूर्ती नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही असे सांगितले जाते.
या मूर्तीचे प्रतिक म्हणून दुसरी मूर्ती मंदिरात स्थापन केली गेली आहे. या मंदिराविषयी अनेक कथा आहेत. स्थानिक सांगतात, बरजूराम नावाचा एक पुजारी मंदिरात पूजा करत असताना काही बाहेरच्या लोकांनी हल्ला चढवला आणि त्याच्या पत्नी, मुलांना ठार मारले. बरजूला जेव्हा हे समजले तेव्हा महामाया प्रकट झाली आणि तिने तू एकटा हल्लेखोरांशी लढू शकतोस फक्त मागे वळून पाहू नको अन्यथा तुझे मस्तक धडावेगळे होईल असे सांगितले.
बरजू लढला पण विजय होतोय असे पाहताच त्याने मागे वळून पहिले आणि त्याचे मस्तक धडावेगळे झाले. जेथे त्याचा मृत्यू झाला तेथे त्यांची समाधी आहे. या मंदिरात अनेक देवी देवताच्या मूर्ती आहेत. ११०० वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे असे सांगतात. त्या काळात एक मुनी येथे आले होते. ते अतिशय कमी बोलत म्हणून त्यांना हप्पा मुनी असे म्हटले जात होते. हप्पा म्हणजे गप्प बसणे. त्यांच्यावरून या गावाचे नाव हप्पामुनी पडले, त्याचे आता हपामुनी झाले आहे. येथे भूताखेतांचा वावर असतो असाही समज आहे.
भुत खेतामुळे येथे तांत्रिक पूजा सुरु झाली होती. त्यावेळी गुन्हे करणाऱ्याला या मंदिरात येऊन शपथ घेण्यास सांगितले जात असे. ज्याने गुन्हा केला असेल तो मंदिरात जाण्यापूर्वीच भीतीने गुन्हा कबुल करत असे. त्यावेळी या प्रकाराला मान्यता होती आता ही प्रथा मागे पडली आहे.