>>सुशिल स. म्हाडगुतमहाराष्ट्रात काहीसा अपरिचित असलेला किल्ला म्हणजे मोरगिरी. मुंबईपासून जवळपास १०० किलोमीटर आणि पुण्यापासून जवळपास ६५ किलोमीटर असलेल्या मोरगिरीचा ट्रेक करायचा गेल्या महिन्यापासुन विचार आमच्या मनात घुटमळत होता. मग काय तो विचार अंमलात आणण्यासाठी जानेवारीची २४ व २५ तारीख नक्की केली. ठरलेल्या दिवशी आम्ही खोपोलीवरुन बाईकने प्रवासाला सुरवात केली. लोणावळामार्गे घुसळखांबहून डावीकडचा फाटा पकडून तुंगच्या रस्त्याला लागलो. घुसळखांबहून तुंगच्या रस्त्याला सव्वा एक किमीवर जांभुळणे ही दहा-पधंरा घरे असलेली छोटीशी वस्ती आहे. तेथेच रस्त्याला लागुन असलेल्या छोट्या हॉटेल वजा टपरीवर कडक चहाचा आस्वाद घेता घेता हॉटेल चालवणाऱ्या मावशीकडून किल्या विषयी थोडशी माहीती घेतली. हॉटेल पासून दोन मिनिटाच्या अंतरावर एका घरासमोर आमची बाईक पार्क करून पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
आमचा किल्यावर रहाण्याचा बेत असल्यामुळे सोबत आठ लिटर पाणी घेण्याचे ठरवले, सोबत इतर साहित्यही होतेच. जसे की खाण्याच्या वस्तु, दोरखंड, भांडी, तंबू, झोपण्याच्या बॅगा व इतर साहीत्य. हे सगळे साहीत्य सोबत घेतल्यामुळे आमच्या बॅगचे वजन प्रत्येकी १२-१५ किलो झालं होतं. त्यामुळे येवढ्या वजनाचे साहीत्य सोबत घेउन मोरगिरी किल्ला सर करायचा होता हे आमच्यासमोर आव्हान होतं. मनाची तयारी तर होतीच आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.
दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी जांभूळणे या गावातून गडाच्या दिशेने चालायला सुरवात केली. सुरवातीला चढण चढताना त्या पायवाटेवर एक चौक लागतो. समोर जाणारी वाट खालच्या दिशेने जाते, डावी उजवीकडून वाटा वरच्या दिशेने जातात. त्यापैकी आम्ही डावीकडची वाट पकडून वरच्या दिशेने चालायला सुरवात केली. काही वेळ वर चढून गेल्यावर एका पठारावर पोहचलो. सुरवातीची चढण थोडी दमछाक करणारी होती. पठारावर थोडेसे पुढे जाताच आम्हाला दूरवर मोगगिरीचे शिखर आणि पुसटसा झेंडा दिसला, आणि आमचं ध्येय दृष्टिपथात आलं. आम्हाला इतक्या लवकर शिखराचे दर्शन होईल असं वाटलं नव्हतं. चला आम्ही योग्य मार्गवर आहोत असं मनात आलं आणि नागमोडी पायवाटेने पुढे चालत राहिलो. वाटेत जंगलात जाणाऱ्या पायवाटाही आहेत या ढोरवाट्या आहेत असा अंदाज आहे. त्यामुळे त्या वाटेने न जाता जंगलाच्या उजव्या बाजुकडून चालत राहायचं तर सहसा चुकायचा प्रश्न येत नाही. आम्ही ढोरवाटेनं जंगलात प्रवेश केला होता पण नंतर बाहेर येऊन जंगलाच्या उजव्या बाजुकडून चालत राहीलो.
थोडं पुढे गेल्यावर डावीकडे “मोरगिरी किल्ला भटकंती सह्याद्रीची ट्रेकर्स (मावळ)” असे फलक काही ठराविक अंतरा-अंतरावर लावलेले आहेत, त्यावाटेने वर किल्ला सर करायला सुरवात केली. ही चढण जंगलातून आत जाते. ही चढण चढायला सुरवात करणार इतक्यात आम्हाला जंगलातील “उद मांजराने” दर्शन दिले. उद मांजराला आमच्या कोनोसा लागताच त्यांनी गर्द जंगलाचे दिशेन धुम ठोकले, ते काही क्षणातच दिसेनासे झाले. उद मांजराची आठवण सोबत घेऊन आम्ही समोरील चढण चढायला सुरवात केली. पंधर-वीस मिनिटे वर चढल्यावर थोडीशी उंच चढण आहे. तेथे दोरखंड लावलेला होता, त्यामुळे ती वाट आम्हाला तेवढी धोकादायक वाटली नाही पण पावसाळ्यात या ठीकाणी उतरताना काळजी घ्यावी लागेल, पावसाळ्यात हा पॅच नक्कीच धोकादायक असू शकतो. पुढे आम्हाला पाषाणात कोरलेले जाखमातेचे मंदिर दिसलं. आम्ही जाखमातेच्या मंदिराजवळ पोहोचायच्या अगोदर तेथे जमा असलेल्या माकडांना आमची चाहुल लागली व क्षणात त्यांनी आजुबाजूला पळ काढला. थोड्याच वेळात आम्ही मंदिरा जवळ पोहचलो, जाखमातेचे दर्शन घेऊन आम्ही पुढची वाटेने चालू लागलो.
जाखमातेच्या मंदिरालगतच वरच्या दिशेने एक लोखंडी शिडी लावलेली होती. हीच शिडी घेऊन आम्ही वरच्या दिशेनं चढायला सुरवात केली. ही शिडी चढताना काळजी घ्यावी, ही धोकादायक ठरु शकते. ही शिडी चढून वर आल्यावर आमच्या लक्षात आले आम्ही मोरगिरीच्या माथ्यावरती आलो आहोत.
माथ्यावरती पोहचल्यावर आम्ही संपूर्ण परिसर पायाखालुन पालथा घातला. गडमाथा हा अगदी अरुंद आहे. मोरगिरीच्या माथ्यावरती उंच असा भगवा ध्वज डोलाने फडकताना दिसतो... त्याकाळी हा गड टेहाळणीसाठी वापरत असावा असा अंदाज आहे. जाखमातेच्या मंदिराजवळ पाण्याच एक टाकं व गडमाथ्यावरती पाण्याच्या दोन टाकं आहेत. आम्हाला माथ्यावरती येईपर्यंत जवळपास दोन तासाचा कालावधी गेला त्यात आम्ही फोटोसेशनेसाठीही काही वेळ घेतला.
आता आमची चर्चा रात्रीची तंबूची जागा, जेवणाची जागा याचावर आला मग काय तंबुसाठी एक जागा निश्चित केल्यावर काम सुरू केले, शेकोटी साठी थोडी लाकडेही जमा केली माझा मित्र प्रदिप ने सुचवल्याप्रमाणे तेथील जागा साफ करुन सुकलेल्या गवताचा बिछाना तयार केला. त्या गवताच्या बिछांन्यावर मस्तपैकी आमचा तंबू उभा केला. या सगळ्या धामधुमीत आमच्या लक्षात आल की आम्ही काही तरी चुकवतो आहे. मग काय सगळी काम बाजुला ठेवली आणि अस्ताला जाणाऱ्या सुर्याचे दर्शन घेतले. काही वेळ निवांत बसून मावळत्या दिनकाराला डोळे भरून पाहत होतो आणि त्याच्या इमेजेस मेंदू नावाच्या हार्ड डिस्क वर सेव्ह करत होतो. सर्व परिसर सोनेरी प्रकाशाने व्यापला होता. निसर्गाने दिलेल्या सुर्यास्त व आजुबाजूचा परिसर डोंगर-दऱ्या यांच्याकडे एकटक पाहत बसलो. काही वेळात अंधाराला बाजूला करत देखणा चंद्र वर आला. चंद्रप्रकाशात जेवणाची तयारी सुरू झाली. आमच्या सोबत टॉर्च होते पण चंद्रप्रकाशापुढे त्याचा काही उपयोग झाला नाही; मग काय जमा केलली लाकडे घेतली आणि चुल पेटवायला घेतली, माथ्यावरती गार वारा जोरात असल्यामुळे, चुल पेटवायला चांगलीच मेहनत करावी लागली. किल्ल्यावर पाण्याचं भलं मोठ्ठं टाकं होतं, तिथेच बाजूला गवत साफ करुन चुल पेटवली, सोबत दोन मोठ्या भरलेल्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आजुबाजूला सुकलेलं गवत होतं चुकून ठीणगी पडली तर आग लागू नये म्हणून काळजी घेतली. चुलीवर जेवण तयार झालं. गप्पा माराता मारता जेवणावर ताव मारला आणि काही वेळातच आमच्या तंबूत झोपायला गेलो.
सकाळी विलोभनिय सूर्योदय पाहीला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
मी तर या ट्रेकची तुलना राजगडाबरोबर करेन. राजगडचा ट्रेक हा माझा आवडता ट्रेक, तो मी वर्षाच्या तीनही ऋतुत केलेला आहे. सध्या गुंजवणे गावातून जी वाट जाते ती अगदी राजमार्ग बनवायंच काम सुरू आहे, म्हणजे ज्यांना गडकिल्ले फक्त पर्यटन स्थळं वाटतात असेही लोक तिथं येतील. किल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टिने विचार व्हावा, तेथील लोकांना व्यवसायाच्या दृष्टिने मदत व्हावी असा विचार असणे नक्कीच गैर नाही, पण कोणत्याही गडाचं रांगड, राकट, गडपण जपणही तेवढंच महत्त्वाचे आहे. गडावर अर्ध्या रस्त्यात जाता येणे, गडावर फिरायला पेव्हर ब्लॉक्सचे पदपथ तयार असतील तर या गडावर आल्यासारखे वाटणारच नाही. गडावरची वाट, बिकट वाट वहिवाट असावी त्याशिवाय चालायला ही मजा नाही येत. मोरगिरीवर अशा गरज नसलेल्या सुधारणा होण्याची शक्यता नाही, त्यामुळे राजगडच्या ट्रेकिंगची हौस आपण मोरगिरीवर जाऊन भागवू शकतो.
- प्रदिप कुळकर्णी
मोरगिरी हा काहीसा अपरिचित किल्ला आहे असं एकून होतो. त्यामुळे गडावर जाताना युट्यूबवरुन माहिती मिळवली. आमच्या काही जाणकार मित्र मंडळी व वॉटसअप ग्रुपवरुन या किल्ल्याबद्दलची माहीती घेतली होतीच. या किल्यावर जाताना काही ठिकाणी धोकादायक पॅच आहे असे सांगितले जात होते. त्यामुळे थोडीशी भीती मनात होतीच पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाहीच. येथे जाताना पिण्याचे पाणी सोबत घेणे जरुरी आहे. जे ट्रेकर्स मनापासून गड-किल्ले फिरणारे आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला ट्रेक आहे.
– सुशिल स. म्हाडगुतsushil999@gmail.com(सुशिल स.म्हाडगुत / प्रदिप कुळकर्णी)