मुंबई : सायकल चालवण्याची आवड एकदा निर्माण झाली की सायकलच त्या व्यक्तीला विविध ठिकाणी घेऊन जाते. हेच सिद्ध करून दाखवलंय मुंबई आणि पुण्याच्या दोन ध्येयवेड्या तरुणींनी. मुंबईची सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले या दोन तरूणींनी काश्मिर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास ३५ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
काश्मिर ते कन्याकुमारी असा पल्ला सायकलने पार करण्यासाठी त्यांनी ३० नोव्हेंबरपासून सुरुवात केली. दिवसाला १२० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठत या २ तरुणींनी ३८६८ किलोमीटरचा एकूण प्रवास पूर्ण केलाय. या संपूर्ण सायकलस्वारीचे 'प्रदूषणमुक्त भारत' व 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे दोन मूळ उद्देश होते.
त्यामुळे सायली आणि पूजाच्या या प्रवासाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सायली आणि पूजा इथवरच न थांबता सायकलवरून हिमालयात प्रवासदेखील करणार आहेत.
आणखी वाचा - ..... यामुळे आहे पुणे मुंबईपेक्षा वरचढ
दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सने खूप मदत केली. अनेक लोकांनी होमस्टेची सोयसुद्धा करून दिली. त्याचसोबत विविध राज्यातील लोकांच्या आपुलकीसोबत तिथल्या पदार्थांच्या चवीसुद्धा चाखता येत होत्या.या मोहिमेआधी रोज ६० किलोमीटरची सायकल सफर या दोघी नियमित करत होत्या. त्याचसोबत पुणे ते सातारा, पुणे ते जेजुरी, पुणे-लोणावळा, कोल्हापूर ते पुणे असे छोटे प्रवास करण्याचा प्रयत्न सायली आणि पूजाने केले. ज्यामुळे या मोहिमेची पक्की तयारी झाली.
या सायकलस्वारीमुळे पहाटे लवकर उठून, सर्व आवरून वेळेत निघायची या तरुणींना सवय लागली. आयुष्यात पुढेही त्यांना या सवयीची नक्कीच मदत होईल असं त्या म्हणतात. त्याचसोबत स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे, असं दोघींचं मत आहे. तसंच, ‘हव्या त्या क्षेत्रात हवी ती गोष्ट एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटूंबियांना आपली स्वप्नं पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा, असंही त्या म्हणतात.
आणखी वाचा - बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग या नऊ ठिकाणी जाऊन याच!