केरळ राज्याला देवाची नगरी म्हटलं जातं. त्यासोबतच येथील नैसर्गिक सुंदरताही पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. आज आम्ही तुम्हाला केरळच्या अशा एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत, जिथे जून महिन्याच्या तापत्या उन्हातही तुम्हाला हिवाळ्यातील थंडीचा अनुभव मिळेल. आम्ही सांगत आहोत ते केरळमधील मुन्नार या हिल्स स्टेशनबद्दल. इडुक्कीमधील हे ठिकाण आधीच हनीमून कपल्समध्ये लोकप्रिय आहे. पण या ठिकाणावर तुम्ही तुमच्या परीवारासोबतही जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या धावपळीच्या जीवनातून काही वेळासाठी सुटका हवी असेल, तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देऊ शकतं.
ढगांमधून पोहोचा मुन्नारला
कोईम्बतूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्ही इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल. थंड वारा आणि हिगवीगार डोंगरं तुमच्या मनाला आनंद देणारा असेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथून प्रायव्हेट गाडीने मुन्नारपर्यंत प्रवास करु शकता. गाडीने 15 किमीचा प्रवास केल्यानंतर तुम्ही डोंगरात पोहोचाल आणि काही वेळातच तुम्हाला ढगांमध्ये असल्याचा अनुभव मिळेल.
मुन्नारमध्ये तीन नद्यांचा संगम
मुन्नार हा एक मल्याळम शब्द आहे. याचा अर्थ तीन नद्यांच्या संगमाची जागा असा होतो. मुन्नारमध्ये मधुरपुजहा, नल्लाथन्नी आणि कुंडाली या तीन नद्या एकत्र होतात. या ठिकाणाची खासियत म्हणजे येथील चहाच्या बागा, इथली घरं, छोट्या नद्या, झरे आणि थंड वातावरण आहे.
आणखी काय पाहता येईल?
देवीकुलम
देवीकुलम हे ठिकाण मुन्नारपासून जवळपास 7 किमी अंतरावर आहे. निसर्गाची आवड असणा-यांसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. वेगवेगळ्या वनस्पती आणि वेगवेगळे प्राणी येथील डोंगर द-यात बघायला मिळतात. इथे वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास करणा-यांनाही जाता येईल. त्यासोबतच ट्रेकर्ससाठीही ही जागा पसंतीची आहे. इथल्या डोंगरद-या ट्रेकर्सना खास आकर्षित करतात.
इको पॉइंट
इथली खासियत म्हणजे इथे तुम्ही तुमच्या मित्राचे नाव उच्चारले तर समोरील डोंगरांमधून तुम्हाला तुमचाच आवाज ऐकू येईल. ही मुन्नारमधील सर्वात लोकप्रिय जागा आहे. मुन्नारपासून केवळ 15 किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण हिरव्यागार झाडांनी व्यापलेलं आहे आणि हे दृश्य मोहिनी घालणारं ठरतं.
मट्टुपेट्टी
मुन्नारपासून 13 किमी अंतरावर समुद्र तळापासून 1700 मीटर उंचीवर मट्टुपेट्टी हे सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही मुन्नारला जाणार असाल तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या. येथील तलाव आणि बांध पर्यटकांना वेगळाच आनंद देतात. इथे तुम्हाला बोटींग करण्याचीही संधी मिळते.
राजमाला
मुन्नारपासून 15 किमी दूर असलेलं हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. इथे तुम्ही नीलगिरी तहर नावाचा प्राणीही सहज पाहू शकता. जगातले अर्ध्यापेक्षा अधिक तहर इथेच मिळतात असे सांगितले जातात.
इराविकुलम राष्ट्रीय उद्यान
वेगवेगळ्या प्राण्यांना बघण्याची आवड असणा-यासाठी हे राष्ट्रीय उद्यान फारच योग्य ठिकाण आहे. इथे तुम्ही कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवू शकता.
चहाच्या बागा
चहाच्या बागांची उत्पत्ती आणि विकासासाठी मुन्नार प्रसिद्ध आहे. उंचच डोंगरांवर या चहाच्या बागा पसरलेल्या आहेत. त्या बघण्याचा वेगळाच आनंद तुम्ही इथे घेऊ शकता.