- अमृता कदमप्रवासामध्ये इकडे-तिकडे फिरल्यावर दमूनभागून जेव्हा आपण परत येतो, तेव्हा गरज असते आरामाची. निवांत होण्याच्या हिशोबानं तुम्ही हॉटेलच्या खोलीवर आलात आणि खोलीची अवस्था जर अजिबात नीट नसेल, अस्वच्छता असेल, बाथरु ममध्ये सोयी उपलब्ध नसतील तर सगळाच विरस होतो. म्हणून हॉटेलचं बुकिंग काळजीपूर्वक करावं. वेगवेगळ्या साइट्सवर दिसणा-या रु म ‘तशाच’ असतील असं नाही. त्यामुळं फसण्यापेक्षा आधीच काळजी घेणं चांगलं. हॉटेलचं बुकिंग करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात.
हॉटेल बुक करताना
1. हॉटेलची जागा
बुकिंग करण्याआधी मॅपवर हॉटेलची नेमकी जागा आणि आसपासचा परिसर याची माहिती घ्यावी. हॉटेलची जागा शहरापासून दूर, काहीशा निर्जन अशा परिसरात नसावी. हॉटेल निवडताना आजूबाजूचा परिसर सुरक्षित आहे ना, याची खातरजमा करणं चांगलं. तुम्हाला जिथं जायचं आहे, ती ठिकाणं हॉटेलपासून अगदी जवळ किंवा प्रवासाच्या दृष्टीनं सोयीची असावीत.
2. फॅमिली फ्रेंडली रु म्स आणि सुविधा
हॉटेलच्या खोलीमध्ये गरजेच्या सगळ्या सुविधा असाव्यात. काही जास्तीच्या सोयी असतील तर अजूनच चांगलं. खोली प्रशस्त असावी, पॉकेट डोअरनं जोडलेलं स्वतंत्र बाथरु म असावं. तसंच वाय-फाय, पार्किंगची सुविधा, ड्रायव्हरसाठी राहण्याची सोय, खाण्या-पिण्यासाठी ‘टेक-अवे’ पद्धत या गोष्टी आहेत की नाही हे एकदा तपासून पाहावं
3. मल्टिपल डायनिंगचे पर्याय
हॉटेल निवडताना वेगवेगळ्या पद्धतीचे डायनिंग आॅप्शन असलेलं हॉटेल निवडावं. फाइन-डाइन, कॉफी शॉप, बुफे असे पर्याय असतील तर फिरु न परतल्यावर आपल्या आवडी आणि सवडीनुसार तुम्हाला जेवणाचा, खाण्याचा आस्वाद घेता येईल. शिवाय अधिकाधिक खाद्यपदार्थांचे पर्यायही तुम्हाला उपलब्ध होतील.
4. खोलीचा आकार
जर तुम्ही कुटुंबासाठी (यात चार जणांचं कुटुंब असं गृहीत धरलंय) एकच रु म घ्यायचा विचार करत असाल तर खोलीचा आकार चौघांसाठी प्रशस्त असेल, हे आवर्जून पाहावं. जास्तीची गादी आणि आवश्यक सामान मिळेल का या पर्यायाचीही खात्री रु म बुक करतानाचा करावी. हॉटेलमध्ये गेल्यावर एक्स्ट्रा बेडिंगसाठी जास्त पैसे मोजावे लागू नयेत म्हणून ही खात्री हॉटेल बुक करण्याआधी करून घ्यावी ‘दिसतं तसं नसतं’ हे लक्षात ठेवूनच केवळ आॅनलाइन फोटो पाहून रूम बुक करण्याऐवजी या गोष्टींचीही खातरजमा केलेली चांगली. म्हणजे फसण्याची आणि पस्तावण्याची वेळ येत नाही.