अॅडव्हेंचर ट्रिपसाठी जायचंय आणि एखाद्या भन्न्टा ठिकाणाच्या शोधात आहात? मग टेन्शन नका घेऊ तुमच्या लिस्टमध्ये मयूरभंजचा नक्की समावेश करा. हे ठिकाण अॅडव्हेंचर्ससोबतच निसर्गसौंदर्यासाठीही अत्यंत उत्तम ठरते. जर तुम्हाला वाइल्ड लाइफचा आनंद अनुभवायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. ओडिशामधील मयूरभंज येथे सिमलिपाल राष्ट्रीय उद्यान अत्यंत सुंदर ठिकाण आहे. जाणून घेऊया या ठिकाणाबाबत आणखी सविस्तर...
तुम्हाला 'सिमलिपाल' हे नाव थोडं विचित्र वाटत असेल पण हे नाव सांवरच्या झाडांमुळे पडलं आहे. हे उद्यान ८४५.७० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेलं आहे. त्याचबरोबर सुंदर झऱ्यांमुळे या उद्यानाचं सौंदर्य आणखी बहरण्यास मदत होते.
सिमलिपालमध्ये हत्ती, वाघ आणि हरणांसोबतच पक्ष्यांच्याही अनेक प्रजाती आढळतात. सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही येथे वाइल्ड लाइफ जवळून अनुभवू शकता.
जाण्यासाठी योग्य वेळ?
सिमलिपाल राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे, हिवाळा. थंडीमध्ये येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात येथील निसर्गसौंदर्य आणखी बहरतं.
कसे पोहोचाल?
जर तुम्हाला सिमलिपालला हवाई मार्गाने पोहोचायचं असेल तर भुवनेश्वर आणि कोलकत्ता यासाठी सर्वात जवळचे एअरपोर्ट आहेत. जर तुम्ही रस्तेमार्गाने जाणार असाल तर भुवनेश्वर, कोलकत्ता आणि बालासोर येथून जाऊ शकता.