(Image Credit : Native Planet Hindi)
त्रिपूराच्या पूर्व भागात धलाई जिल्ह्यात असलेलं कमलपूर आपल्या सुंदरतेसाठी फारच लोकप्रिय आहे. निसर्गाने इथे भरभरून दिलं आहे. त्यामुळे तुम्ही जर उन्हाळ्याची सुट्टी निर्सगाच्या सानिध्यात घालवण्याचा विचार करत असाल तर हे बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतं.
कमलपूरमध्ये तुम्हाला केवळ निसर्गच नाही तर येथील संस्कृती, येथील जनजाती यांचं वेगळं जीवनही बघायला मिळतं. त्यामुळे इथे शहरातील धावपळीतून आल्यावर तुम्हाला कधीही न अनुभवलेली शांतता अनुभवता येऊ शकते. इथे बघण्यासारखी वेगवेगळी ठिकाणे आहेत. जाणून घेऊ त्या ठिकाणांबाबत....
उनाकोटी
उनाकोटीचा बंगाली अर्थ होतो 'एक कोटीपेक्षाही कमी'. ७व्या शतकापासून उनाकोटी एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. इथे भगवान शिवाची मूर्ती आहे. ही मूर्ती कल्लू कुमारने तयार केली होती. असे सांगितले जाते की, या व्यक्तीच्या स्वप्नात भगवान शिव आले होते, त्यांनीच याला एक विशाल मूर्ती तयार करण्याचा आदेश दिला होता. तसेच इथे भगवान विष्णु, गणेश, नंदी, नरसिंह, हनुमान आणि इतरही काही देवी-देवतांच्या मूर्ती आहेत.
राइमा घाटी
कमलपूरच्या राइमा घाटीतील नैसर्गिक सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतं. राइमाला त्रिपुरा जनजातीच्या आईचा दर्जा दिला जातो. या घाटातून वाहणारी राइमा नदी येथील सौंदर्यात आणखी भर घालतात. तसेच या घाटात अनेकप्रकारच्या वनस्पती आढळतात. तुम्हाला जर एखाद्या शांत ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता.
रोवा अभयारण्य
रोवा अभयारण्य जवळपास ८६ हेक्टर परिसरात पसरलेलं आहे. तसेच इथे वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पती सुद्धा आढळतात. या ठिकाणी देखभाल खासी जनजातीकडून केली जाते. हे अभयारण्य एक पर्यटन स्थळ आहेच. पण येथील जैविक विविधता या ठिकाणाला वेगळं महत्त्व देते.
हेरिटेज पार्क
हेरिटेज पार्क कमलपूरपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. हे या शहरातील एकमेव मनोरंजन पार्क आहे. आणि त्यामुळे इथे पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. सुंदर फूटपाथ, फुलांच्या बागा आणि औषधी वनस्पती असलेला हा पार्क १२ एकराच्या परिसरात पसरलेला आहे. या पार्कमध्ये आदिवासी, गैर आदिवासी त्रिपुराचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा समावेश आहे.
कमलेश्वरी मंदिर
कमलेश्वरी मंदिर हे शहराच्या केंद्रस्थानी आहे. हे मंदिर देवी कालीचं मंदिर आहे. इथेही तुम्ही भेट देऊ शकता.
इथे जाण्यासाठी योग्य वेळ
हिवाळ्यात इथे फार जास्त थंडी असते. त्यानंतरही तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता. थोडी कमी झाल्यावर इथे आणखी चांगल्याप्रकारे सुट्टी एन्जॉय करू शकाल.