- अमृता कदमसध्या म्यानमार हा बराच चर्चेत आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीमुळे आणि आता रोहिंग्यांच्या प्रश्नामुळे.राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेला म्यानमार हा देश निसर्ग सौंदर्यानं समृध्द आहे. या छोट्याशा देशात सुंदर पर्यटनस्थळंही आहेत . भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशांची पर्यटनातली ख्याती तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आपल्या जवळच असलेल्या म्यानमारमध्येही खूप काही बघण्यासारखं आहे.
श्वेदागोन पॅगोडा
म्यानमारची राजधानी असलेलं यंगून मुंबईप्रमाणेच गजबजलेलं, बहुआयामी शहर आहे. याच शहरात जगातल्या भव्य पॅगोडांपैकी एक श्वेदागोन पॅगोडा आहे. या पॅगोड्याचं छत संपूर्णपणे सोन्यानं मढवलेलं आहे. त्यावर हिरे आणि माणकंही मढवलेली आहेत. इथे एक स्तूपही आहे. पाच बुद्धांच्या काही आठवणींचं जतन या स्तूपामध्ये केलं आहे. काकूसंध बुद्धांची छडी, कोणगमी बुद्धांची पाण्याची झारी, कश्यप बुद्धांचं वस्त्र आणि गौतम बुद्धांचे आठ केस या स्तूपात जतन केले आहेत. कन्डोजी तलावाच्या किना-यावर असलेल्या सिन्गुटरा डोंगरावर हा पॅगोडा आहे. तुम्हाला इथूनच संपूर्ण यंगून शहराचं दर्शन होतं. हे ठिकाण पवित्र बौद्ध स्मारक आहे.यंगूनमध्ये या पॅगोड्याखेरीज अनेक छोट्या-मोठ्या बागा आहेत. त्यामुळेच या शहराला ‘गार्डन सिटी आॅफ इस्ट’ म्हणतात.बहादुरशहा जफरची मजारअखेरचा मुघल बादशहा बहादूरशहा जफरला 1857चा उठाव दडपल्यानंतर ब्रिटीशांनी कैद करून यंगूनमध्येच ठेवलं होतं. तिथेच वयाच्या 89व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याला यंगूनमध्येच दफन करून ब्रिटीशांनी त्याची मजार बांधली. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून भारतीय पर्यटकांसाठी हे ठिकाण महत्त्वाचं आहे.
बागान शहर
बागान म्यानमारमधलं एक प्राचीन शहर आहे. बौद्ध धर्मातलं प्रसिद्ध ठिकाण आनंद मंदिर या शहरात आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारतीय पुरातत्व विभागानं भरपूर मदत केली आहे. केवळ आनंद मंदिरच नाही तर बागानमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित इतरही प्राचीन मंदिरं आहेत. शिवाय अनेक बौद्ध मठही आहेत. इथल्या प्राचीन बौद्ध परंपरा मोठ्या निष्ठेनं जतन करु न म्यानमारच्या शासकांनी आपली बौद्ध धर्माशी असलेली बांधिलकी जपली आहे.
इनले तलाव
म्यानमारमधील हा तलावही पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या, चारी बाजूंनी भाताची शेतं आणि त्यांनी वेढलेला हा तलाव. हे दृश्यच डोळ्यांचं पारणं फेडतं. या तलावात मासेमारी चालते आणि विशेष म्हणजे मच्छिमार ही होडी वल्हवण्यासाठी पायांचा वापर करतात. त्यासाठी विशेष प्रकारची वल्हीही बनलेली आहेत. होड्यांमधले बाजार हे या तलावाचं अजून एक वैशिष्ट्य. हे तरंगते बाजार इनले तलावाला एकदम रंगीबेरंगी बनवून टाकतात. हा तलाव इतका विस्तीर्ण आहे, की यामध्ये अनेक छोटी छोटी बेटंही बनलीयेत.
ताऊंगकालत मठम्यानमारमधल्या पोपा पर्वतावरच हा पोपा ताऊंगकालत मठ आहे. इथे पोहचण्यासाठी 777 पाय-या चढून जाव्या लागतात. पण उंचावर गेल्यावर दिसणारा नजारा श्रमपरिहार करतो.आशियाई देशांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि सिंगापूर, बँकॉक आणि दुबईच्या पलिकडचा विचार करत असाल तर त्यासाठी म्यानमार हा नक्कीच उत्तम पर्याय आहे.