पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सिक्कीमला पहिल्या विमानतळाची भेट दिली. सिक्कीममध्ये पाकयोग विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सिक्कीम देशातील इतर राज्यांशी आणि शहरांशी जोडलं गेलं. याआधी सिक्कीमपासून सर्वात जवळ असणारं विमानतळ 124 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे आता तुम्हाला सिक्कीमला येण्यासाठी ट्रेनचा प्रवास करावा लागणार नाही. या विमानतळामुळे तुम्ही थेट सिक्कीममध्ये पोहचू शकणार आहात.
सिक्कीममध्ये उभारलेले नवीन विमानतळ पाकयोग शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ एका सुंदर डोंगरावर तयार केलेलं आहे. यामुळे सिक्कीममधील सुंदर पर्यंटन स्थळांपर्यंत पोहोचणं अगदी सहज शक्य होणार आहे. आज आम्ही तुम्हाला सिक्कीममधील अशा पर्यटन स्थळांबाबत सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची पुढची ट्रिप नक्की प्लॅन करू शकता.
1. युक्सोम
सिक्कीमचे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वात आधी राजधानी यक्सोमला भेट द्या. सिक्कीम विमानतळावरून येथे पोहोचण्यासाठी फक्त 5 तासांचा प्रवास करावा लागतो. असं सांगण्यात येतं की, सिक्कीमच्या सर्वात पहिल्या श्रेष्ठ शासकांनी 1641मध्ये तीन विद्वान लामांकडून या शहराचे शुद्धीकरण करून घेतलं होतं. नोर्बुगांगा कोर्टेनमध्ये या गोष्टीचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. सिक्कीममधील हे ठिकाण सर्वात पवित्र मानलं जातं. कारण सिक्कीमचा इतिहासच या ठिकाणापासून सुरू होतो. या ठिकाणी प्रसिद्ध माउंटन कंचनजंघाची चढाई करण्यासाठी बेस कॅम्पही आहेत. तुम्ही जेव्हाही सिक्कीमला भेट द्याल त्यावेळी युक्सोमला भेट द्यायला विसरू नका.
2. सोम्गो लेक
निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिक्कीममध्ये डोंगरदऱ्यांसोबतच येथील लेकही मन प्रसन्न करतात. येथील सर्व लेकपैकी प्रसिद्ध असणारा लेक म्हणजे सोम्गो लेक. या लेकपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 तास लागत असत. तेच आता या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 3 तासांचा अवधी लागणार आहे. हा तलाव जवळपास 1 किलोमीटर अंतरावर पसरलेला असून अंडाकृती आकाराचा आहे. येथे राहणारी लोकं या लेकला फार पवित्र मानतात. वर्षभर आपल्या सौंदर्याने अनेकांना भूरळ घालणाऱ्या या लेकच्या ठिकाणी मे आणि ऑगस्टमध्ये अनेक दुर्मीळ फुलं उगवतात. यामध्ये बसंती गुलाब, आयरिस आणि निळ्या-पिवळ्या फुलांचा समावेश होतो. तलावमध्ये अनेक जलचर प्राणी आणि विविध जातींचे पक्षी आढळून येतात.
3. नाथुला दर्रा
तुम्हाला जर बाईकींग करण्याचा आनंद अनुभवायचा असेल तर सिक्कीमला गेल्यानंतर नाथुला दर्राला अवश्य भेट द्या. पाकयोग विमानतळापासून या ठिकाणी पोहोचण्यासाठी3 तास लागतात. 14,200 फूट उंचावर नाथुला दर्रा भारत-चीन सिमेवर आहे. येथील निसर्ग सौंदर्य तुमचं मन प्रसन्न करण्यासोबतच तुमचा सर्व थकवाही दूर करण्यास मदत करेल. येथील धुक्याची चादर ओढलेले डोंगर आणि हिरव्यागार डोंगरांमधून वाहणारे झरे निसर्गाचं अद्भुत दर्शन घडवतात.
4. पेलिंग
सिक्कीममधील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे पेलिंग. 6,800 फूट उंचावर वसलेल्या या ठिकाणावरून जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक असलेल्या माउंट कंचनजंघाला सर्वात जवळून पाहता येतं. नवीन विमातळावरून येथे पोहोचण्यासाठी फक्त 4 ते साडे चार तासांचा अवधी लगतो. पेलिंगमध्ये सांगा चोइलिंग मोनास्ट्री, पेमायंगत्से मोनास्ट्री आणि खेचियोपालरी लेक हे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.