- उमाकांत तासगांवकर
माणसाच्या आयुष्यात काही अनपेक्षित असे आनंद योग असतात. असाच एक खास आनंद योग श्रीलंकेचे 'मुंबईतील दूतावास' व 'श्रीलंकापर्यटन विभाग' यांच्यामुळे जूळून आला आणि मी श्रीलंकेत पोहोचलो. श्रीलंका हा भारताचा छोटा शेजारी देश दक्षिणेला आहे. चहुकडून समुद्राने वेढलेला असल्यामुळे हा देश एक बेट आहे. मात्र निसर्गाने या देशाला अत्यंत भरभरुन दिले आहे. याची प्रचिती श्रीलंकेत हिंडताना पदोपदी येते.
मी ज्या वेळेस श्रीलंकेच्या कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय बंदरनायके विमानतळावर पोहोचलो. त्यावेळेस पहाटेचे 5:30 वाजले होते आणि अर्थातच अंधार होता. पण अंधुक प्रकाशात जेव्हा मी कोलंबोच्या दिशेने जायला लागलो. तेव्हाच लक्षात आले की, आपण अप्रतीम हिरवाईच्या देशात आलो आहोत. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त शहर! पूर्व आणि पश्चिमेचा सुंदर मिलाम या शहरात पहायला मिळतो. शहर अतिशय स्वच्छ आहे. तेथील गंगाराम बुध्द मंदीर हे अतिशय पहाण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे डच, चर्च, टाऊन हॉल, तेथील पार्लमेंट परिसर आणि कोलंबोला लाभलेला अतिशय सुंदर समुद्र किनारा हे पहाण्यासारखे आहे. कोलंबो येथील हंबनटोटा हे बंदर चीनने पूर्णपणे विकत घेतले असून आता त्याचा सर्वांगिण विकास चीन करीत आहे. कोलंबो हे श्रीलंकेतील केवळ राजधानीचे शहर नसून समुद्री बंदर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठी प्रसिध्द आहे़ श्रीलंकेतील दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे 'दंबूल्ला' गुंफा मंदीर हे एका डोंगरावर असून जगातील सर्वात मोठे रंगविलेले भगवान बुध्दांचे गुंफा मंदीर आहे. यामध्ये सुमारे 22 हजार चौरस फुट एवढा भाग पेंटींग्ज त्याचप्रमाणे बुध्द मुर्ती, बुध्दाच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि नजरेत भरतील अशी अनेक बुध्द शिल्पे यांनी नटलेला आहे. 'दंबूल्ला' गुंफा मंदीराप्रमाणेच सिगीरीया नावाचे दुसरे गुंफा मंदीर आहे. सिगीरीया काय आहे हे, अनेक वर्ष लोकांना माहित नव्हते. सिगीरीया हा एक किल्ला आहे. 'सिगीरीया' या शब्दाचा अर्थ सिंहाचे राहण्याचे ठिकाण. किल्ल्याचा आकार सिंहासारखा आहे. त्यामुळे त्याचे स्थानिक भाषेत सिगीरीया हे नाव पडले. सिगीरीयाचा डोंगर सुमारे 600 फुट उंच आहे आणि तेथे चढून जाणे हे बरेच दमवणारे काम आहे. तरी अनेक लोक भगवान बुध्दांवरील अतुट श्रध्देने हा किल्ला चढून जातात. आतमध्ये चढून गेल्यावर भगवान बुध्दाचे सुंदर पेंटींग आणि डोंगरात खोदलेल्या मुर्ती आहेत. श्रीलंकेतील अजून एक सुखावणारा भाग म्हणजे हबराणा खेडे आणि त्याला लागून असलेला मिनेरीया सफारी पार्क येथे एकाच वेळी तुम्हाला सुमारे 100 हत्ती दिसू शकतात. या खेरीज अनेक सुंदर पक्षी आणि प्राणी तुमचे मन मोहन टाकतात. मिनेरिया जंगल पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. हबराणाहून तुम्हाला श्रीलंकेचे दुसरे प्रसिध्द बंदर आणि शहर त्रिंकोमाली येथे जाता येते. त्रिंकोमालीचा समुद्र किनारा अतिषय सुंदर आहेच. परंतु तेथे एक मोठे नावीक वस्तुसंग्रहालय, तसेच तेथील पोनेष्वरम हिंदू मंदीर ही प्रसिध्द आहे. कोलंबोपासून साधारण 250 किलोमीटर अंतरावर त्रिंकोमाली वसलेले आहे. त्रिंकोमाली येथे अनेक तमिळ लोकांची वस्ती असून अनेक हिंदू मंदीरेही आहेत. त्रिंकोमालीच्या किल्ल्यावरुन त्रिंकोमाली शहर आणि बंदराचे सुंदर दृष्य दिसते. मला सगळयात आश्चर्य वाटलेली एक गोष्ट म्हणजे त्रिंकोमाली हे बऱ्यापैकी गजबजलेले शहर असूनही तेथील रस्त्यावर तुम्हाला हरणे हिंडताना दिसतील. त्रिंकोमालीच्या समुद्र किनाऱ्यावर मी दोन मोर देखील पाहिले. शहरामध्ये या प्राणी-पक्षांचे दर्शन होणे ही दुर्मिळ गोष्ट आहे हे आपणही मान्य केले पाहिजे.
(Image Credit : Casquette)
श्रीलंकेचे एक सर्वात प्रसिध्द हिलस्टेशन म्हणजे 'कॅण्डी'! 'कॅण्डी' हे स्थळ सुंदर हवामान आणि भव्य बुध्द मंदीर या करीता प्रसिध्द आहे. येथील भव्य बुध्द मंदीर डोळयांचे पारणे फेडते. येथे भगवान बुध्दांचा पवित्र दात ठेवलेला आहे. तो पहाण्यासाठी रोज संध्याकाळी 6:30 वाजता पर्यटक आणि भावीकांची प्रचंड गर्दी होते. मंदीर उघडण्याआधी मंदीराला लागून असलेल्या एका प्रेक्षागृहात लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमही दाखवला जातो. संपूर्ण श्रीलंका हा अतिशय स्वच्छ देश आहे. भारतीयांना तेथे जेवणाचा अजिबात त्रास होणार नाही.
श्रीलंकेमध्ये 'सिनेमन ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मोठे जाळे आहे आणि ही हॉटेल्स अतिशय सुंदर आहेत. हबराणा या खेड्यात सिनेमन ग्रुप चे हॉटेल पाहून मला अतिशय आश्चर्य वाटले. पण येथील आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची गर्दी बघून हॉटेलचेही प्रयोजन कळले. श्रीलंका पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री़ सतीश बालसुब्रह्मण्यम हे रविवार असून मला भेटले आणि सुमारे तासभर आम्ही पर्यटनावर चर्चा केली. आपण पर्यटन आणि पर्यटकांप्रती किती संवेदनशील आहोत याचा प्रत्यय त्यांनी दिला. परत श्रीलंकेतच भेटायचे असे ठरवून मी त्यांचा निरोप घेतला.
आठ दिवसाच्या श्रीलंकेच्या दौऱ्यात अनेक चांगली माणसे व अनेक चांगले प्राणी-पक्षी व झाडे-झुडपे पहायला मिळाली. भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंका हा परवडणारा जवळचा आणि आपल्या संस्कृतीशी नाते सांगणारा देश आहे. तेथे भेट देणे हे ही पर्यायाने सोपे आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांनी आपली पुढील सुट्टी श्रीलंकेत साजरी करण्याचा अवश्य विचार करावा. छोट्या गटांकरीता श्रीलंका हा पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो. दरवर्षी श्रीलंकेला सुमारे 20 लाख पर्यटक भेट देतात व त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा श्रीलंकेत उपलब्ध आहेत. मग कधी जाताय श्रीलंकेला?