भारताच्या सीमा अनेक देशांशी जुळलेल्या आहेत. पण त्यात अधिक तणावपूर्ण ठिकाणे म्हणजे पाक, चीन सीमा आहेत. या जागा नजरेसमोर आल्या कि लगेच तारेची उंच कुंपणे, सैनिक, चोवीस तास गस्त आणि तणाव डोळ्यासमोर उभा राहतो. भारत पाक सीमा तर जगातील सर्वाधिक तणावपूर्ण सीमेपैकी एक मानली जाते. पण जगात काही देशांच्या सीमा अश्याही आहेत जेथे तणाव, काटेरी तारा, सैनिक यांचे काही कामच नाही. या सीमा नागरिक सहज पार करू शकतात.
नेदरलंडच्या लिमबर्ग प्रांतात असे एक ठिकाण आहे जेथे नेदरलंड, बेल्जियम आणि जर्मनी या तीन देशांच्या सीमा मिळतात. अगदी छोटासा कसबा असलेले हे ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून साधारण १० हजार फुट उंचीवर असलेल्या या ठिकाणचे नाव आहे वाल्स. नेदरलंड मधील हे सर्वात उंचीवरचे स्थळ आहे. अनेक पर्यटक आणि या तिन्ही देशातील प्रवासी येथे आवर्जून येतात. या ठिकाणी मधोमध एक दगड आहे. त्याच्या एका बाजूवर एन, दुसरीकडे बी आणि तिसरीकडे जी अशी इंग्रजी अक्षरे आहेत. या ठिकाणी एक पाउल जरी तुम्ही पुढे टाकले तर दुसर्या देशाच्या हद्दीत जाता येते. त्यासाठी पासपोर्ट, व्हिसाची गरज नाही.
या तिन्ही देशांच्या सीमा म्हणजे फक्त रेषा आहेत. कुठला देश कुठल्या बाजूचा हे समजण्यासाठी एन म्हणजे नेदरलंड, बी म्हणजे बेल्जियम आणि जी म्हणजे जर्मनी ही अक्षरे दगडावर लिहिली गेली आहेत. विशेष म्हणजे युरोपियन युनियन मधील सर्व देशांनी ओपन बॉर्डर पॉलीसी स्वीकारली आहे. त्यामुळे तेथे नागरिक सहज एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करू शकतात.