राजस्थानची ओळख म्हणजे, तेथील भव्य किल्ले आणि वास्तू. राजस्थानमधील गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या जयपूरला शनिवारी युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. युनेस्कोच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करण्यात आलेले असून ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'राजस्थानातील जयपूर शहराची निवड वारसा स्थळांच्या यादीत केली आहे.'
जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स 1727 मध्ये केली होती. अनेक देशी-विदेशी पर्यटक जयपुरमध्ये फिरण्यासाठी येत असतात. जयपुरमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे तुम्ही ट्रिप प्लॅन करायचा विचार करत असाल तर एकदा तरी नक्की भेट द्या.
हवामहल
जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं हवामहल जयपूरची शान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपलं वेगळं अस्तित्व सांगणाऱ्या या वास्तूचा वापर शाही कुटुंबातील सदस्य मोकळ्या हवेमध्ये फिरण्यासाठी करत असत. या महालाच्या खिडक्यांमधून रस्त्यावरील जौहरी बाजाराचं सुंदर दृश्य दिसत असे.
आमेर फोर्टला जवळपास 200 वर्षांपूर्वी राजा मानसिंह, मिर्जा राजा जय सिंह आणि सवाई जय सिंहद्वारे तयार करण्यात आला होता. किल्ला मूठा तलावाच्या किनाऱ्यावर स्थित आहे. यामध्ये महाल, मंडप, हॉल, मंदिर आणि बगीचे आहेत.
जयगढचा किल्ला
आमेर फोर्टच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगरावर तयार करण्यात आलेला जयगढचा किल्ला आहे. या किल्ल्यावर जगातील पहिली आणि सर्वात मोठी तोफ ठेवण्यात आली आहे. या किल्ल्यावर तुम्हाला जुनी हत्यारं, शाही कुटुंबांचे फोटो असलेली गॅलरी आणि इतरही अनेक गोष्टी पाहायला मिळतील.
(Image Credit : goomo.com)
नाहरगढचा किल्ला
नाहरगढचा किल्ला जयगडपेक्षाही वरती असलेल्या डोंगरावर आहे. येथे तुम्हाला राजस्थान आणि देशाच्या इतिहासाशी निगडीत अनेक गोष्टी पाहता येतील.
(Image Credit : Travelogy India)
सिटी पॅलेस
जर तुम्हाला राजा-महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जवळून माहिती करून घ्यायची असेल तर सिटी पॅलेसला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला त्यांचे पोशाख, डायनिंग हॉल, बग्गिया आणि इतरही अेक गोष्टी पाहता येतील.
अलबर्ट हॉल
जयपूरमध्ये असलेला अलबर्ट हॉल एक म्यूझियम आहे. येथे तुम्हाला जुन्या काळातील भांडी, क्रॉकरी, हत्यारं, पोशाख आणि एक ममी देखील पाहता येईल. येथे एक ममी देखील ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक अझरबॅजान येथील बाकू येथे 30 जूनला सुरू झाली असून 10 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यात जयपूर शहराच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला व त्यानंतर या शहराला यादीत समाविष्ट करण्यात आले.