नवी दिल्ली: भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे. इथे दिवसभर हजारो गाड्यांची ये-जा होत असते. भारतातील अनेक रेल्वे गाड्या आपल्या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. रेल्वेचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे मात्र, भारतातील सर्वात जुन्या रेल्वेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या भारतात एक अशी देखील रेल्वे आहे जी मागील ११० वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आली आहे. वर्षोनुवर्षे रेल्वेमध्ये खूप सुधारणा होत गेली आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक रेल्वे चर्चेचा विषय बनली आहे.
भारतातील सर्वात जुनी रेल्वे म्हणून पंजाब मेलची जगभर ख्याती आहे. या रेल्वेची सुरूवात १ जून १९१२ रोजी झाली होती. तेव्हापासून आजतागायत ही रेल्वे प्रवाशांची सेवा करत आहे. मात्र कोरोनामध्ये लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेच्या सेवेला काही काळ ब्रेक लागला होता.
पेशावरपासून मुंबईपर्यंत प्रवास
मागील महिन्यात या रेल्वेने ११० वर्षे पूर्ण करून १११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र आज देखील गाडीची वेगमर्यादा प्रति तास ११० किलोमीटर एवढी आहे. १९१२ मध्ये जेव्हा रेल्वे सुरू झाली होती तेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्या काळात ही रेल्वे मुंबई आणि पेशावर बंदरावर असलेल्या बॅलार्ड पिअर स्टेशनदरम्यान धावत असे. विशेष म्हणजे ही एकमेव अशी रेल्वे होती जी प्रवाशांना पेशावरपासून मुंबईपर्यंत पोहोचवत होती.
प्रवासासाठी फक्त इंग्रजांना मुभा
सुरुवातीला या रेल्वेमधून फक्त ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १९३० मध्ये या गाडीतील प्रवास सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला. १९४७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभागले गेले, तेव्हा या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. नंतर ही रेल्वे पंजाबमधील फिरोजपूर ते मुंबईपर्यंत धावू लागली. ही गाडी कोळशावर धावत होती आणि ती मुंबई ते पेशावर २४९६ किमीचे अंतर ४७ तासांत पूर्ण करत होती.