एकीकडे अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. दुसरीकडे, रामायणाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून श्रीलंकेपर्यंत एक शानदार हवाई टूर पॅकेज सुरू केले आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजला 'द रामायण सागा' टूर पॅकेज असे नाव दिले आहे.
आयआरसीटीसीच्या लखनौ कार्यालयाने लखनौ ते श्रीलंका हे 07 दिवस आणि 06 रात्रीचे टूर पॅकेज लॉन्च केले आहे. हे टूर पॅकेज 09 मार्च 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. 'द रामायण सागा' या नावाने चालवल्या जाणाऱ्या या टूर पॅकेजमध्ये कोलंबोमधील मुनेश्वरम मंदिर, कँडीमधील मनावरी राम मंदिर आणि स्पाइस गार्डन, रामबोडा वॉटर फॉल, टी गार्डन, न्यूआरा एलियामधील सीता अम्मा मंदिर, अशोक वाटिका, ग्रेगरी लेक, दिवारुम्पोला मंदिर (सीता अग्नि चाचणी स्थळ), कोलंबो, कँडी आणि न्यूआरा एलिया या ठिकाणी आयआरसीटीसीद्वारे भेट घेता येईल.
या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी लखनौ ते कोलंबो आणि लखनौ परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हवाई टूर पॅकेजमध्ये, राउंड ट्रिप हवाई प्रवास, तीन तारांकित हॉटेलमध्ये निवास, भारतीय भोजन व्यवस्था (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण) आयआरसीटीसीद्वारे केले जाईल. तसेच, या टूर पॅकेजसाठी, सोबत राहणाऱ्या तीन व्यक्तींसाठी पॅकेजची किंमत 71000 रुपये प्रति व्यक्ती अशी निश्चित करण्यात आली आहे. तर दोन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत ७२२०० रुपये प्रति व्यक्ती आहे. एका व्यक्तीच्या मुक्कामासाठी पॅकेजची किंमत 88800 रुपये प्रति व्यक्ती आहे. तसेच, आई-वडीलांसोबत राहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी पॅकेजची किंमत 57300 रुपये (बेडसह) आणि 54800 रुपये (बेडशिवाय) प्रति व्यक्ती आहे.
या संदर्भात माहिती देताना आयआरसीटीसीचे उत्तर प्रदेश लखनौचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, या पॅकेजचे बुकिंग पहिल्यांदा करणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर केले जाईल. तसेच, या टूरच्या बुकिंगसाठी, पर्यटन भवन, गोमती नगर, लखनौ आणि कानपूर येथे असलेल्या आयआरसीटीसी कार्यालयात आणि आयआरसीटीसी वेबसाइट www.irctctourism.com वरूनही ऑनलाइन बुकिंग करता येईल.