पर्यटनासाठी गेल्यावर त्यातही हिल स्टेशनला गेल्यावर अनेकांची गरम कपडे, शॉल्स, अन्य काही खास भेट वस्तूंची खरेदी होतच असते. मनाली, सिमला, नैनिताल, दार्जिलिंग अश्या ठिकाणी भेट दिली असेल तर अशी खरेदी हवीच. मग तेथील मॉल रोड म्हणजे बाजार यांची चर्चा आलीच. पण कधी तुमच्या मनात बहुतेक साऱ्या हिल स्टेशनवर मॉल रोड नावाचा रस्ता का असतो असा कधी विचार आला नसेल. त्यामागचा इतिहास म्हणूनच जाणून घ्यायला हवा.
१७ व्या १८ व्या शतकात भारताच्या अनेक भागांवर ब्रिटीश अधिकाऱ्यांचे नियंत्रण होते. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी हे अधिकारी उन्हाळ्यात पहाडी भागातील थंड हवेच्या ठिकाणी राहत असत. त्यात सेनेसाठी काही खास जागा होत्या. त्यातलीच एक जागा म्हणजे मॉल रोड.
या रोडच्या आसपास विवाहित, नवविवाहित सेना अधिकारी राहत असत त्यामुळे याला लिव्हिंग लाईन असेही म्हटले जात असे. सेनेसंदर्भातले अधिकृत निर्णय येथेच घेतले जात. आणखी एक कारण म्हणजे या रस्त्यावर मोठी दुकाने, रेस्टॉरंट असत. इंग्रज या परिसराला मुख्य बाजार रु रुपात पाहत असत. हे त्या त्या शहराचे मुख्य केंद्र मानले जाई. सायंकाळी ब्रिटीश सेना पहारा देताना मॉल रोड वरील चकचकाट पाहून परिवार, मित्रांसह येथे फिरत असत. याच रोड वर मुख्य कार्यालये, अग्निशमन सेवा, पोलीस मुख्यालय असत आणि आजही आहेत.
या मार्गावर आपत्कालीन वाहने सोडून अन्य वाहनांना बंदी असे. आज अश्या अनेक रस्त्यांची नावे बदलली गेली आहेत मात्र तरीही ते मॉल रोड म्हणूनच ओळखले जातात. असा सर्वात सुंदर मॉल रोड कुठला विचाराल तर त्याचे एकमुखी उत्तर आहे सिमल्याचा मॉल रोड.