भारतातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांवर फिरायला जाण्याची आधीपासूनच क्रेझ आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक ठिकाणांचा मिलाफ तर अनेकांना दिलासा देणारा ठरत असतो. फिरायला जाण्यासाठी असंच एक खास ठिकाण म्हणजे गुजरातमधील सपूतरा. अशी मान्यता आहे की, याच ठिकाणी वनवासादरम्यान भगवान राम यांनी 11 वर्ष काढली होती. या ठिकाणी धार्मिक स्थळांचं दर्शन घेण्यासोबतच येथील सुंदर निसर्गाचाही मनसोक्त आनंद घेऊ शकता. चला जाणून घेऊ या ठिकाणाची खासियत...
सापांचं घर
गुजरातमधील या डोंगराळ भागाच्या सपूतरा नावाचा अर्थ सापांचं घर असाही होतो. इथे सापांच्या वेगवेगळ्या प्रजातीही बघायला मिळतात. तसेच येथे काही ठिकाणी सीमेंटचे मोठमोठे सापही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सुंदर निसर्गासोबत तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींचे सापही इथे बघायला मिळतात.
कधी जावे?
सपूतरामध्ये उन्हाळ्यात फारच चांगलं वातावरण असतं. प्रत्येकवर्षी इथे मॉनसून उत्सवही साजरा केला जातो. ज्यात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. यात डेअरिंग अॅक्टीव्हीटीज, जेवण, खेळ अशा गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही इथे तुमच्या मित्रांसोबत बोटींगचाही आनंद घेऊ शकता. त्यासोबतच इथे भगवान राम यांची अनेक मंदिरेही बघता येतील.
सनसेट आणि सनराइजची मजा
सनसेट आणि सनराइजचं मनोहारी दृश्य तुम्ही इथे अनुभवू शकता. त्यासोबतच येथील पर्वतांची सुंदरता जवळून अनुभवण्यासाठी रोप-वेचाही वापर करु शकता. येथील रोप-वे देशातील सर्वात लांब रोप-वे आहे.
सपूतारा म्युझिअम
सपूतरामध्ये डांग नावाच्या जमातीच्या लोकांची संख्या अधिक आहे. येथील म्युझिअममध्ये त्या लोकांचे नृत्य, वेशभूषा, राहणीमान हे बघायला मिळतं. त्यासोबतच इथे अनेकप्रकारचे पक्षी, मातीच्या भांड्याचे प्रदर्शनही आहे.
आर्टिस्ट व्हिलेज
हे ठिकाण त्या लोकांसाठी खूप खास आहे ज्यांना कलेची आवड आहे. हे सुंदर गाव वेगवेगळ्या कलांसाठी प्रसिद्ध आहे. लोक इथे कलाकृतींचा आनंद घेऊ शकता आणि त्यांची खरेदीही करु शकता. या गावात कमी खर्चात राहण्याची व्यवस्थाही होऊ शकते.