- निशांत महाजनउन्हाळ्याच्या सुटीत मुलांना घेवून ट्रीपला जायचंय? पण वेळ नाही म्हणता, लांब कशाला जायला हवं, तुमच्या शहरांत, तुमच्या गल्लीतही भल्या सकाळीच काय दुपारी, संध्याकाळी ऊन उतरतानाही एक चक्कर मारुन तुम्ही मुलांसह स्वत:लाही एक अद्भूत, रंगबिरंगी सफर फुकटात घडवू शकता. एक पैसा खर्च न करता निसर्गानं दिलेले उन्हाळ्याचे अत्यंत व्हायब्रण्ट कलर्स घरी घेवून येवू शकता. आणि नजरेचं पारणं फेडणारं सौंदर्य पाहताना जगाचं भानही काही काळ विसरु शकता!खरं नाही ना वाटत? नाहीच वाटणार, कारण आपल्या नजरेसमोर भर उन्हात चालणारा हा निसर्गाचा रंगोत्सव आपण पाहतच नाही. आपल्या लाईफस्टाईलच्या तोऱ्यात निसर्गाच्या जादूई रंगाची एक सर सुद्धा आपल्या नजरेत उतरत नाही. आणि मग मुलांना मॉलमध्ये नेण्यापलिकडची दुसरी कुठलीच भारी जागा आपल्याला दिसत नाही. कारण आपल्यालाच त्या जागा माहिती नसतात. त्यामुळे जरा नजर ‘तयार’ करा, तुमच्या शहरातच, नेहमीच्या ये-जा करण्याच्या, आॅफिसच्या रस्त्यांवर दिसतील ही झाडं, ती पहा. त्यांच्या फुलांचा रंग-गंध जमल्यास श्वासात भरुन आणा. हा उन्हाळा मग आजवरच्या साऱ्या उन्हाळ्यापेक्षा वेगळा तर असेलच, पण आपण उन्हाळा जगलो असंही वाटेल..त्यासाठी उन्हाळ्यात बहरलेली ही झाडं पहा. अनेक महानगरपालिकांच्या कृपेनं जुने वृक्ष कापले गेलेले असले तरी अशी काही झाडं त्यांनी लावलेली आहेत. काही जुनीही आहेतच. त्या बहरलेल्या झाडांची ही एक झलक. तुमच्या शहरांत पोहचलाय का हा बहर जरा पहा. आणि डोळ्यांसह मनाला आणि जीवालाही जरा रंगागंधांचा गारवा द्याच..बहावा
बहाव्यावर जीवापाड प्रेम करणारे वाट पाहतात खरंतर उन्हाळ्याची, तो फुलण्याची. बहरण्याची. तो सगळा सोनेरी शृंगार भल्या पहाटे तर नुस्ता पहात रहावा, सुर्याची किरणं पडली त्याच्या अंगावर की मग तर तो झळाळूनच उठतो. अनेक शहरांत सध्या हा बहावा बहरला आहे. तो नक्की पहा.गुलमोहोर
एरव्ही काय येताजाता आपण गुलमोहराची झाडं पाहतो. रस्त्याच्या कडेला असली तर सावलीला पार्किंग बरं वाटतं आपल्याला. पण त्या झाडाकडे सध्या जरा नजर उठाके देखो तो सही! लालचुटूक झालाय गुलमोहर. इतका बहरलाय की पान दिसू नये हिरवं. सोनसळी उन्हात तर तो लालेलाल दिसतो. गुलमोहराची ही विलक्षण देखणी जादू पाहिली नाही तर काय पाहिलं मग?सोनमोहोर
सोनमोहोर हे झाड खरंच सोन्याचा मोहोर असलेलं झाड आहे. सध्या अनेक शहरांत ही झाडं नव्यानं लावली गेली आहेत. सोन्याचा मोहोर येतो त्यांना उन्हाळ्यात. बघा आपल्या शहरांत सोनमोहोर नक्की दिसतील.नीलमोहोर
नीलमोहोर हे झाड दुर्मिळ आहे असं आपल्याला उगीच वाटतं. गुलमोहोराइतकं सरसकट कुणी लावलं नसेल पण आपल्या शहरांत नीलमोहोर दिसतात. त्यांचा तो निळा साजशृंगार उन्हाळ्यात बहरतो. त्यात निलमोहोराच्या कमानी दिसल्या कुठं तर पहा, सारा रस्ता निळा होतो. ही निळाई फार कमी दिवस दिसते, ती पहा..आकाशशेवगा
अफ्रिकन ट्युलिप खरंतर हे झाड. मराठीत काहीजण त्याला आकाशशेवगा म्हणतात. तसं अगदी सर्रास दिसतं आपल्याकडे. लांबून पाहिलं तर गुलमोहोरासारखंच लालसर तांबडं दिसतं. पण जवळ जा, फुलं टप्पोरी, तांबूस लालसर दिसतात. लाल आणि तांबड्याच्या या छटा फार सुंदर.ताम्हण
महाराष्ट्राचं राज्यफुल हे. पाहिलंय ते कधी? घाटाघाटानं प्रवास करताना, डोंगर दऱ्यात तरी. निळसर जांभळा, जांभळा अशा रंगात फुलणारं ताम्हण पाहून किती सुख वाटतं ते पहायचं असेल तर हा उन्हाळा चुकवू नका. ताम्हण एकदा तरी जवळून पहाच.