उन्हाळ्यात रोड ट्रिपला जाण्याची क्रेझ अलिकडे चांगलीच वाढलेली बघायला मिळते. रोड ट्रिपची खासियत म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने एन्जॉय करता येतं. मात्र, रोड ट्रिपला जाताना काही गोष्टींची खूप जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. जर ही खास तयारी केली नाही तर तुमची ही रोड ट्रिप मोठी अडचणींची ठरु शकते.
1) रस्त्याची माहिती
ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. याचा फायदा असा होतो की, तुमचा वेळ वाचतो. तुम्ही रस्ता चुकणार नाहीत. विचार करा की, तुम्ही रोड ट्रिपला निघाले आहात आणि तुम्हाला रस्ताच माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावरील लोकांना विचारत वितारत जावं लागेल. यात तुमचा मोठा वेळ वाया जाणार आणि तुमचं शेड्यूल बिघडणार.
2) जीपीएसवर विश्वास ठेवू नका
रोड ट्रिपवर जातांना चुकूनही जीपीएसवर अवलंबून राहू नका. कारण काही ठिकाणी नेटवर्कची अडचण येऊ शकते. अशात तुम्ही एकतर मार्ग चुकाल नाहीतर एकाच ठिकाणी अडकून पडाल. खरंतर हरवून जाण्यातही एक मजा आहे. पण यामुळे तुमचं शेड्युल नक्कीच कोलमडणार.
3) ब्रेक घ्या
रोड ट्रिपला जाताना कुणाला तरी सोबत घ्या. कारण लांबच्या प्रवासात तुम्ही एकट्याने ड्राईव्ह करणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही. याने तुम्हाला थकवा येऊ शकतो. अशात तुम्ही एखादा मित्र सोबत घ्याल, तर तुम्हाला ड्रायव्हिंगपासून ब्रेक मिळेल.
4) गाडीची सर्विसिंग
रोड ट्रिपला जाताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या गाडीने प्रवास करणार आहात, ती गाडी सुस्थितीत आहे ना याची शहानिशा करुन घ्या. कारण त्या गाडीने जर अर्ध्या रस्त्यात तुम्हाला दगा दिला, तर तुमची पंचाईत होईल. त्यामुळे प्रवासाला निघण्याआधीच गाडीची सर्व्हिसिंग करुन घ्या.
5) खाण्याच्या वस्तू, फर्स्ट एड, पिण्याचे पाणी
रोड ट्रिपला निघतांना सोबत खाण्याच्या वस्तू सोबत घेणे कधीही फायदयाचे ठरते. कारण रस्त्यात तुम्हाला बाहेरचं खावं लागणार नाही. यामुळे तुमचं पोटही चांगलं राहिल. तसेच सोबत एक्स्ट्रा पाणीही घ्या. त्यासोबतच तुम्ही तुमच्यासोबत फर्स्ट एड बॉक्स घ्या.